इथेनॉल, सहवीजनिर्मिती प्रकल्पाने मिळाली संजीवनी
By Admin | Published: May 5, 2015 03:00 AM2015-05-05T03:00:48+5:302015-05-05T03:00:48+5:30
साखरेचे घसरलेल्या दरामुळे अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत. मात्र, ज्या कारखान्यांनी मद्यार्क, सहवीज आणि बायोगॅस सारखे प्रकल्प राबविले आहेत
महेश जगताप, सोमेश्वरनगर
साखरेचे घसरलेल्या दरामुळे अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत. मात्र, ज्या कारखान्यांनी मद्यार्क, सहवीज आणि बायोगॅस सारखे प्रकल्प राबविले आहेत. तेच कारखाने सध्याच्या अडचणीच्या काळात तग धरून आहेत. विशेषत: इथेनॉल व सहवीज निर्मिती प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेला मागणी असल्याने या कारखान्यांना फायदेशीर ठरत आहे.
या हंगामात साखर उद्योग मंदिच्या सावटखालून चालला आहे. कारखाने सुरू झाल्यापासून वारंवार पडणाऱ्या साखरेच्या दरामुळे राज्य सहकारी बँकेने पाच वेळा साखरेच्या पोत्यावरील मूल्यांकन कमी केले. त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले. राज्यातील साखर हंगाम संपला तरीही एकाही कारखान्याने शासनाने ठरवून दिलेली एफआरपी दिली नाही. यासाठी शेतकऱ्यांना एफआरपी देता यावी, यासाठी उशिरा का होईना, केंद्र सरकार कारखान्यांच्या मदतीला धावून आले आहे. राज्य सरकारने साखर कारखान्यांसाठी २ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, याबाबत अजून कोणत्याही हालचाली दिसत नसल्याचे चित्र आहे.
राज्यातील ४० कारखाने वगळता इतर कारखान्यांनी शेतकऱ्यांना अजून एफआरपी अदा केली नाही. यासाठी कारखान्यांना अजून अद्याप ४०० ते ५०० रूपये कमी पडत आहेत. केंद्राने महाराष्ट्र राज्यासाठी २ हजार कोटीची जरी मदत केली असली तरी या रकमेतून शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी अदा होऊ शकणार नाही. त्यामुळे ज्या कारखान्यांकडे उपपदार्थ निर्मिती प्रकल्प आहेत. त्याच कारखान्यांकडून एफआरपी प्रमाणे दर मिळू शकतो.
राज्यातील ६७ सहकारी व खाजगी कारखान्यांनी साखर उत्पादनांबरोबरच डिस्टलरी प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पाची गुंतवणूक अत्यंत कमी असून नफा मात्र चांगला आहे.
पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढल्याने इथेनॉल बरोबरच अल्कोहोलचे दरही वाढले आहेत. राज्यात सहकारी व खासगी ६७ डिस्टलरी बरोबरच फक्त इथेनॉल निर्मिती करणारे ३४ सहकारी तर ५८ खासगी प्रकल्प आहेत. हे सर्व प्रकल्पांची मिळून वर्षाकाठी ९० ते ९२ कोटी लिटर उत्पादन क्षमता आहे. मात्र चालू वर्षी राज्यातील उपपदार्थ प्रकल्पांमधून केवळ २० कोटी इथेनॉल निर्मिती झाली आहे. सन २०१४— १५ या हंगामात राज्यात ६० ते ६५ कोटी लिटर अल्कोहोलचे उत्पादन घेतले गेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी इथेनॉल व अल्कोहोलचे दर ४ ते ५ रूपयांनी वाढले आहेत.