कारखान्यांचे इथेनॉल ऑईल कंपन्यांच्या दारात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:10 AM2021-03-24T04:10:31+5:302021-03-24T04:10:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र सरकारच्या आदेशावरून साखर कारखान्यांनी तयार केलेल्या इथेनॉलचे टँकर ऑईल कंपन्यांच्या प्रवेशदारात अडकून पडले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्र सरकारच्या आदेशावरून साखर कारखान्यांनी तयार केलेल्या इथेनॉलचे टँकर ऑईल कंपन्यांच्या प्रवेशदारात अडकून पडले आहेत. देशभरात हीच स्थिती आहे.
पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी इथेनॉल लागते. पेट्रोलचे दर वाढल्यामुळे खप कमी झाला आहे. त्यामुळे ऑईल कंपन्यांकडील इथेनॉलचे साठे पडून आहेत. नव्याने इथेनॉल घेतले तर ते साठवायचे कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. नेमकी हीच अडचण साखर कारखान्यांची आहे. केंद्र सरकारने कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले.
देशभरातील कारखान्यांना इथेनॉल प्रकल्प उभा करण्यासाठी कर्जावरील व्याजावर अनुदान जाहीर केले. कारखान्यांनी ऑइल कंपन्यांबरोबर करार करून इथेनॉल तयार करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडेही आता इथेनॉल साठवण्यासाठी टाक्या नाहीत. त्यामुळे करार झाल्याप्रमाणे ते टँकर भरून इथेनॉल ऑईल कंपन्यांकडे पाठवत आहेत व कंपन्या ते घ्यायला तयार नाहीत.
थांबलेल्या टँकर्सचे भाडे व अन्य खर्च कारखान्यांना करावा लागतो आहे. आधीच आर्थिक अडचणीत आलेले राज्यातील इथेनॉलनिर्मिती करणारे कारखाने या नव्या समस्येने हैराण झाले आहेत. ऑईल कंपन्यांकडून रोख पैसे मिळाले तर किमान एफआरपी तरी भागवता येईल, या त्यांच्या विचारापुढेच आता प्रश्नचिन्ह लागले आहे.
कोट
राज्यातल्याच नाही तर देशातील सर्वच कारखान्यांसमोर हा प्रश्न निर्माण झाला आहे. पेट्रोलियम खात्याच्या सचिवांना याबाबत कळवले असून, ते कारखाने व ऑइल कंपन्या अशी संयुक्त बैठक आयोजित करत आहेत.
- जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राज्य साखर संघ
कोट
टँकर अनलोड व्हायला पाचसात दिवस लागत आहेत हे खरे आहे. पेट्रोलचा खप कमी झाला त्यातून ही समस्या तयार झाली. यंदाच्या हंगामातच उत्पादन वाढले आहे. कारखान्यांना त्यांच्याकडे साठवणूक क्षमता करण्यासाठी वेळ लागेल. यावर उपाय काढला जात आहे.
- संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, साखर संघ