इथेनॉल निर्मिती ३० ते ३५ कोटी लिटरने वाढणार; मोलॅसेसवरील निर्यातीवर ५० टक्के निर्यात शुल्क लावल्याचा परिणाम
By नितीन चौधरी | Published: January 17, 2024 05:08 PM2024-01-17T17:08:56+5:302024-01-17T17:09:17+5:30
सध्याचे साखरेचे उत्पादन बघता साखरेची मागणी, गेल्या वर्षीचा साठा याचा विचार करता पुढील तीन महिने पुरेल एवढी साखर देशभरात उपलब्ध होऊ शकते
पुणे : केंद्र सरकारने सी मोलॅसेसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरात ६.८७ रुपये प्रति लिटर अशी घसघशीत वाढ केल्याने तसेच मोलॅसेसवरील निर्यातीवर ५० टक्के निर्यात शुल्क लावल्याने इथेनॉल निर्मिती ३० ते ३५ कोटी लिटरने वाढणे अपेक्षित आहे, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केला आहे. परिणामी इथेनॉल बंदीमुळे मध्यंतरीच्या काळात झालेल्या नकारात्मक निर्णयामुळे देशातील इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याचे प्रमाण १०.५० टक्क्यापर्यंत घसरले होते, ते या वर्षाच्या अखेरपर्यंत किमान १२ ते १५ टक्क्यापर्यंत जाईल, असेही महासंघाचे मत आहे.
याबाबत महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले, “मोलॅसेसवरील निर्यातीवर ५० टक्के निर्यात शुल्क लावल्याचा सकारात्मक परिणाम कारखानदारीवर होऊन इथेनॉल निर्मिती वाढू शकते. त्यापूर्वी केंद्र सरकारने सिरप व ज्यूसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर निर्बंध आणले होते. मुळात हा निर्णय हंगामापूर्वी घेणे अपेक्षित होते. केंद्र सरकारने त्यानंतर हा निर्णय काही प्रमाणात दुरुस्त केला. मात्र, त्याचा फायदा होताना दिसत नाही. साखर उपलब्धतेत घट होईल अशी केंद्र सरकारला भीती होती. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर देशभरात झालेल्या पावसामुळे साखर उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याचे साखरेचे उत्पादन बघता साखरेची मागणी, गेल्या वर्षीचा साठा याचा विचार करता पुढील तीन महिने पुरेल एवढी साखर देशभरात उपलब्ध होऊ शकते.”
३०५ लाख टनांचा अंदाज
देशात १५ जानेवारीपर्यंत ५०९ साखर कारखान्यांत १ हजार ५६३ लाख टन उसाचे गाळप झाले असून त्यातून १४८.७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उसाचे गाळप आणि साखर उत्पादनात महाराष्ट्राने आजपर्यंत आघाडी राखली आहे. या गाळप हंगामाअखेर देशात किमान ३०५.५० लाख टन साखरेचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. यात आणखी ८ ते १० लाख टनांची वाढ होण्याचा अंदाज आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र उत्पादनात आघाडीवर
ऊस गाळप व साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक हे तीन राज्ये देशात आघाडीवर असून त्यात त्यांचे योगदान ७५.८३ टक्के आहे. महाराष्ट्रातील १९७ कारखान्यात ५४८.३९ लाख टन ऊसगाळप झाले असून त्यातून ५१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर उत्तर प्रदेशातील १२० कारखान्यांतून ४६५.६६ लाख टन उसाचे गाळप होऊन ४६.१० लाख टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले. कर्नाटकातील ६९ कारखान्यांतून ३२२.९२ लाख टन उसाचे गाळप झाले असून त्यातून ३१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. या तीनही राज्यात ऊस पिकाला परतीच्या पावसामुळे मोठा फायदा झाल्याने साखर उत्पादनात वाढ होताना दिसत आहे.
साखर उताऱ्यात महाराष्ट्र पाचवे
सरासरी साखर उताऱ्यात उत्तर प्रदेश देशात आघाडीवर असून तेथे ९.९० टक्के सरासरी उतारा मिळाला आहे. त्या खालोखाल तेलंगणाचा क्रमांक असून तेथे साखर उतारा ९.७५ टक्के असा आहे. कर्नाटकात साखर उताऱ्याचे प्रमाण ९.६० टक्के असे आहे तर मध्य प्रदेशात साखर उतारा ९.५० टक्के असा आहे. महाराष्ट्रात साखर उतारा ९.३० टक्के असून वाढत्या थंडीने याच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गुजरात, बिहार, हरयाणा आणि उत्तराखंडमध्ये साखर उताऱ्याचे प्रमाण प्रत्येकी सरासरी ९.२० टक्के असे आहे.