इथेनाॅलचा पेट्रोलमध्ये वीस टक्के मिश्रणाचा निर्णय क्रांतिकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:08 AM2021-06-06T04:08:18+5:302021-06-06T04:08:18+5:30

इंदापूर : भारत सरकारने इथेनाॅलचा पेट्रोलमध्ये २० टक्के मिश्रणाचा निर्णय जाहीर केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी १ एप्रिल ...

Ethanol's decision to blend 20 per cent into petrol is revolutionary | इथेनाॅलचा पेट्रोलमध्ये वीस टक्के मिश्रणाचा निर्णय क्रांतिकारक

इथेनाॅलचा पेट्रोलमध्ये वीस टक्के मिश्रणाचा निर्णय क्रांतिकारक

Next

इंदापूर : भारत सरकारने इथेनाॅलचा पेट्रोलमध्ये २० टक्के मिश्रणाचा निर्णय जाहीर केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२३ पासून होणार आहे. या निर्णयामुळे देशातील साखर उद्योगाला बळकटी प्राप्त होणार असून अतिरिक्त साखर उत्पादनावर नियंत्रण ठेवता येणार आहे. साखर उद्योगाच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय स्वागतार्ह असल्याचे प्रतिपादन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे शुक्रवारी केले. भारत सरकारच्या राजपत्रात पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाची यासंदर्भातील अधिसूचना दि.२ जून २०२१ रोजी प्रसिद्ध झाली आहे, अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली.

पाटील पुढे म्हणाले, सध्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल हे मिसळण्यात येत आहे. तेल कंपन्यानी चालू वर्षी ५०० कोटी लिटर इथेनॉलचे टेंडर काढले असून आजपर्यंत साखर कारखान्यांनी सुमारे ३२५ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. साखर कारखान्यांकडून ऑक्टोबरपर्यंत इथेनॉलची निर्मिती सुरू राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने वीस टक्के मिश्रणासाठी दीड वर्षाचा कालावधी हा नियोजनपूर्वक ठेवला आहे, असे नमूद करून हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, प्रारंभी इथेनॉल मिश्रणास २ टक्के मान्यता होती, नंतर ५ टक्के पुढे १० टक्के झाली. आता टप्प्याटप्प्याने सध्याचे इथेनॉलचे १० टक्के मिश्रणाचे प्रमाण वाढविले जाऊन ते १ एप्रिल २०२३ रोजीपासून २० टक्के केले जाईल. त्यामुळे दरवर्षी १००० कोटी लिटर इथेनॉलची तेल कंपन्यांकडून मागणी होईल, इथेनॉलला चांगले दर मिळत आहेत.

देशात ५ कोटी तर महाराष्ट्रात ४० लाख शेतकरी उसाचे पीक घेतात. साखर उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे ५० ते ६० हजार कोटींची झाली आहे. गेली ३ वर्षे अतिरिक्त उत्पादनामुळे साखर शिल्लक राहत आहे, त्यामुळे साखर उद्योग सध्या अडचणीत आला आहे.

महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात ६५ व खासगीत ४५ इथेनॉल प्रकल्प आहेत. आगामी काळात या प्रकल्पांची क्षमता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. त्यामुळे सुमारे एकूण १० ते १५ टक्क्यांपर्यंत साखरेचे उत्पादन हे इथेनाॅलकडे वळविले जाईल. त्यामुळे अतिरिक्त साखर उत्पादनाची अडचण दूर होण्यास मदत होईल. दरम्यान, आगामी २०२१ -२२ हंगामासाठी ऊस पिकाखालील क्षेत्र वाढलेले असून ते ११.५० लाख हेक्टर एवढे झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त साखर उत्पादनास इथेनॉल निर्मिती हाच एकमेव पर्याय असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

देशात १२० लाख मेट्रिक टन साखर अतिरिक्त

चालु वर्षी देशात ३२० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले आहे. देशात घरेलू साखरेची २५० ते २५५ लाख मेट्रिक टनाची मागणी राहणार आहे. त्यामुळे चालू वर्षी ५० ते ६० लाख मेट्रिक टन साखर अतिरिक्त होणार आहे. पाठीमागचा शिल्लक ७० लाख मेट्रिक टन साखर साठा धरून देशात एकूण १२० लाख मेट्रिक टन साखर अतिरिक्त होणार असल्याचा अंदाज हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने ६० लाख मेट्रिक टन साखर निर्यातीस परवानगी दिल्याने साखर उद्योगास दिलासा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

- हर्षवर्धन पाटील, माजी सहकार मंत्री

Web Title: Ethanol's decision to blend 20 per cent into petrol is revolutionary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.