वेताळ टेकडीवर दिसला युरोपियन मधुबाज! महाराष्ट्रातील पहिलीच नोंद

By श्रीकिशन काळे | Published: November 15, 2024 07:15 PM2024-11-15T19:15:07+5:302024-11-15T19:15:37+5:30

पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात पहिल्यांदा हा पक्षी पहायला मिळाला असल्याचे जाणकारांनी सांगितले.

European honey bee seen on Vetal Hill First record from Maharashtra | वेताळ टेकडीवर दिसला युरोपियन मधुबाज! महाराष्ट्रातील पहिलीच नोंद

वेताळ टेकडीवर दिसला युरोपियन मधुबाज! महाराष्ट्रातील पहिलीच नोंद

पुणे : वेताळ टेकडी ही जैवविविधता संपन्न असून, या टेकडीवर नुकतेच दुर्मिळ असा युरोपियन हनी बझर्ड म्हणजे युरोपियन मधुबाज पक्षी आढळून आला आहे. या पक्ष्याचे छायाचित्र देखील टिपले आहे. पक्षी निरीक्षण करताना याची नोंद झाली आहे. पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात पहिल्यांदा हा पक्षी पहायला मिळाला असल्याचे जाणकारांनी सांगितले.

वेताळ टेकडीवर १३० हून अधिक पक्षी पहायला मिळतात. त्यामध्ये आता या मधुबाजची भर पडली आहे. त्यामुळे ही वेताळ टेकडी वाचविणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत टेकडीप्रेमींनी व्यक्त केले आहे. मधुबाज हा पक्षी युरोपातून स्थलांतर करुन आपल्या देशात आला. त्याचे दर्शन वेताळ टेकडीवर होणे ही एक ऐतिहासिक नोंद ठरणार आहे. हिवाळ्यामध्ये अनेक पक्षी स्थलांतर करतात. परदेशातील अनेक पक्षी आपल्या भारतात येतात आणि प्रामुख्याने शिकारी पक्षी गवताळ प्रदेशात येतात. शिकारी पक्ष्यांमधील 'ओरिएन्टल हनी बझर्ड' म्हणजेच मधुबाज हा पक्षी सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात आढळतो. पण, याच कुळातील दुर्मीळ युरोपियन हनी बझर्ड मात्र आपल्याकडे दिसत नाही. या पक्ष्याची ही नोंद महाराष्ट्रातील पहिलीच आहे. वन विभाग आणि वेताळ टेकडी बचाव कृती समितीतर्फे नुकतेच बर्ड वॉक झाला. त्यामध्ये पुण्यातील पक्षी निरीक्षिक अनिरुद्ध गोखले,पंकज इनामदार, मयूर आरोळे, शमिक परब, निषाद होमकर यांचा समावेश होता. त्यांनी वेताळ टेकडीवर फिरताना त्यांना या पक्ष्याचे दर्शन झाले. या पक्ष्याचे छायाचित्र टिपल्यानंतर हा नेहमी दिसणारा मधुबाज असू शकतो, असं सर्वांना वाटले. पण आदेश शिवकर यांनी पक्ष्याची खरी ओळख सांगितली.

आपल्याकडे मधुबाज आणि युरोपियन मधुबाजच्या प्रजननातून संकरित झालेल्या पक्ष्यांच्या नोंदी आहेत. पण, पुण्यात दिसलेला युरोपियन मधुबाज हा कोणत्याही संकरमधला नाही. हा पक्षी युरोप आणि मध्य आशियामधून स्थलांतरीत होतो.

युरोपियन मधुबाजाच्या पंखाखाली काळ्या रंगाचा गडद पॅच दिसतो, जो मधुबाज पक्ष्यामध्ये नसतो. त्याच्या डोळ्याचा रंग पिवळा असून, मधुबाजापेक्षा युरोपियन मधुबाजाचा आकार आणि पंखाचा विस्तार मोठा असतो. युरोपियन मधुबाजाच्या पंखाच्या कडेला आणि शेपटीच्या शेवटाला एकच मोठा पट्टा असतो. मधुबाजामध्ये हे पट्टे संख्येने दोन ते तीन असतात. - अनिरुद्ध गोखले, पक्षीनिरीक्षक

आम्ही वेताळ टेकडीवर पक्षीनिरीक्षण करण्यासाठी बर्ड वॉक घेतला होता. त्यामध्ये आम्हाला हा दुर्मिळ पक्षी आढळून आला. इतरही अनेक पक्ष्यांचे दर्शन झाले. त्यामुळे वेताळ टेकडी ही जैवविविधता संपन्न असल्याचे स्पष्ट होते. -रणजित राणे, संयोजक, बर्ड वॉक

Web Title: European honey bee seen on Vetal Hill First record from Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.