पैसे घेऊन तब्बल १७८ विद्यार्थ्यांचे गुण वाढविणाऱ्या मुल्यमापन प्रमुखाला पुण्यात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 03:14 PM2020-09-14T15:14:44+5:302020-09-14T19:10:29+5:30
हा प्रकार मॉडेल कॉलनीतील सिंम्बायोसिसमध्ये सप्टेंबर २०१८ ते डिसेंबर २०१९ दरम्यान घडला आहे.
पुणे : स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी बनावट केस हिस्ट्रीज तयार करुन विद्यार्थ्यांच्या गुणांचे पुर्नमुल्यमापन करताना १७८ विद्याथ्याचे गुण वाढवून दिलेल्या मुल्यमापन प्रमुखाला सायबर पोलिसांनीअटक केली आहे.
संदीप रामकृष्ण हेंगले (वय४९, रा. वृंदावन अपार्टमेंट, गणेशमळा, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सायबर पोलिसांनी त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. हेंगले यांचा साथीदार सुमित कुमार याचा शोध घेतला जात आहे.
हा प्रकार मॉडेल कॉलनीतील सिंबायोसिसमध्ये सप्टेंबर २०१८ ते डिसेंबर २०१९ दरम्यान घडला आहे. संदीप हेंगळे हे सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचे मुल्यमापन विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत. याबाबत पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, यातील आरोपी हेंगले हा सिम्बायोसिस संस्थेमध्ये नोकरीला असताना त्यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संस्थेच्या परस्पर संस्थेतील १७८ विद्यार्थीच्या बनावट केस हिस्टीज तयार केल्या व त्याद्वारे संस्थेस अंधारात ठेवून संस्थेच्या संगणक प्रणालीद्वारे १७८ विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क वाढविले आहेत.
आरोपीने वापरलेले डिव्हाईस संगणक, हार्ड डिस्क, मोबाईल पेड्राईव्ह हे जप्त केले आहेत. गुन्हा करण्यासाठी आरोपीने इतर साथीदारांची मदत घेतल्याचे दिसून येत आहे. आरोपीने टोळी स्वरुपात काम केल्याचे दिसून येत आहे. १७८ विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क वाढविण्यासाठी आरोपीस पैसे मिळाले आहेत. संबंधित विद्यार्थी व आरोपी यांचा संपर्क कसा झाला व ग्रेस मार्क वाढविण्याच्या बदल्यात आरोपीस पैसे कसे मिळाले. १७८ विद्यार्थी हे पूर्ण भारतामधील आहेत. त्यामुळे आंतरराज्यीय टोळी स्वरुपाचा गुन्हा झाला आहे. ही संस्था नामांकित असून संस्थेमध्ये आरोपी एकटाच ग्रेस मार्कसाठी केस हिस्ट्रीज बनवु शकत नाही.त्यास संस्थेतील इतर कोणी मदत केली आहे का याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.हा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.