तक्रारी करूनही दारूचे गुत्ते सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2015 04:11 AM2015-07-20T04:11:32+5:302015-07-20T04:11:32+5:30
खेड तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील गावांमध्ये गावठी दारूगुत्त्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. मात्र त्यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासनाला सपशेल अपयश येत आहे.
शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील गावांमध्ये गावठी दारूगुत्त्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. मात्र त्यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासनाला सपशेल अपयश येत आहे.
व्यावसायिकांनी अडचणींच्या ठिकाणी गावठी दारूचे गुत्ते उभारले आहेत. या गुत्त्यांमधून छुप्या मार्गाने दिवस-रात्र गावठी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. बहुतांशी ग्रामस्थांनी वारंवार पोलिसांकडे तक्रारी करूनसुद्धा हे गुत्ते बंद होत नसल्याची सत्यस्थिती आहे. त्यामुळे खाकीची ताकद अशा व्यावसायिकांसमोर कमी पडते की काय? असा संतापजन्य प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वडगावच्या स्मशानभूमी परिसरातील दक्षिणवाहिनी भीमा-भामा नदीच्या पात्रात कोयाळी हद्दीत राजरोसपणे दारूगुत्ते सुरूआहेत. आठ-दहा दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी एकत्र येऊन येथील दारूगुत्ता उद्ध्वस्त केला होता. मात्र संबंधित व्यावसायिकांनी तो दोन दिवसांनी पुन्हा सुरूकेल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.
शेलपिंपळगाव-दावडी रस्त्यावर विद्युत कक्षाशेजारील परिसरात गावठी दारू गुत्त्यामधून राजरोसपणे दारूची विक्री केली जात आहे. बहुळ गावाच्या हद्दीत एक-दोन ठिकाणी दारूगुत्ते असून, मोहितेवाडी परिसरात चिंचोशी रस्त्यालगत दारूचा गुत्ता असून तिथे मोठ्या प्रमाणात गावठी दारूची विक्री होत आहे.
अनेक दिवसांपासून भीमा-भामा नदीच्या पात्रात दारू व्यावसायिकांनी विनापरवाना गावठी दारू तयार करण्याचे गुत्ते थाटले आहेत. वडगाव-घेनंद गावात महिलादिनी रणरागिणींनी एकत्र येऊन दारूबंदीचा ठराव मंजूर केला होता. मात्र शेजारील गावाच्या हद्दीत अज्ञातस्थळी लपून-छपून चालणाऱ्या या दारूगुत्त्यांमुळे या निर्णयाला केराची टोपली दाखवली जात आहे. नदीच्या पात्रात उत्खनन करून दारू बनविण्यासाठी चूल आणि लागणाऱ्या इतर सोयींची पूर्तता व्यावसायिकांनी केली असून, याच ठिकाणी हा व्यवसाय केला जातो. हे गुत्ते पोलिसांनी तत्काळ बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.