World Wildlife Day: मृत्यूनंतरही प्राण्याला तब्बल १०० वर्षे पाहता येणार; जाणून घ्या 'या' कलेचं वैशिष्ट्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 04:16 PM2022-03-03T16:16:39+5:302022-03-03T16:17:24+5:30

एखादा प्राणी मृत झाला की, त्याला परत पाहता येत नाही, पण जर तो मृत झाल्यावरही त्याला पाहता आलं तर किती भारी वाटेल ना

Even after death the animal can be seen for 100 years Know the feature of art | World Wildlife Day: मृत्यूनंतरही प्राण्याला तब्बल १०० वर्षे पाहता येणार; जाणून घ्या 'या' कलेचं वैशिष्ट्य

World Wildlife Day: मृत्यूनंतरही प्राण्याला तब्बल १०० वर्षे पाहता येणार; जाणून घ्या 'या' कलेचं वैशिष्ट्य

googlenewsNext

श्रीकिशन काळे

पुणे : एखादा प्राणी मृत झाला की, त्याला परत पाहता येत नाही, पण जर तो मृत झाल्यावरही त्याला पाहता आलं तर किती भारी वाटेल ना! होय आता तशी सोय करता येते. याला टॅक्सिडर्मी असे म्हणतात. प्राणी पक्षी जतन करण्याची इंग्रजांनी भारताला दिलेली कला टॅक्सिडर्मिस्ट चंद्रशेखर पाटील व रोहित खिंडकर हे जपत असून, यांद्वारे ते प्राणी संवर्धनाचे काम करीत आहेत. एखादा प्राणी मृत झाल्यावर त्याला टॅक्सिडर्मी केली, तर तो प्राणी तसाच शंभर वर्षे पाहता येतो.

भारतात अवघे सहा टॅक्सिडर्मिस्ट शिल्लक आहेत. त्यातील चंद्रशेखर पाटील आणि रोहित खिंडकर हे प्रसिद्ध आहेत. यांचे योगदान मोठे आहे. भारतात बडोद्याला एम. एस. युनिव्हर्सिटी येथे एथिकल टॅक्सिडर्मी शिकविले जायचे, त्या शेवटच्या बॅचचे विद्यार्थी म्हणजे चंद्रशेखर पाटील आणि त्यांचे शिष्य रोहित खिंडकर. आज भारतातील वस्तू संग्रहालयामधील सर्व ट्रॉफी जवळजवळ ७०-८० वर्षे जुन्या आहेत आणि जीर्ण होऊन खराब होत आहेत. त्यांना योग्य वेळी रिस्टोर केलं नाही, तर सर्व नामशेष होऊन भारतातील हा दुर्मीळ नैसर्गिक वारसा संपुष्टात येईल. याच कारणामुळे परदेशातून अनेक ऑफर येऊनही चंद्रशेखर व रोहित हे भारतातच संवर्धन करीत आहेत. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या ठिकाणी अनेक शहरातील वस्तुसंग्रहालय, वन विभाग व वन संस्था यांसाठी चंद्रशेखर पाटील हे काम करतात. टॅक्सिडर्मीची पूर्ण प्रक्रिया व्हायला साधारण २० दिवस ते ८ महिन्यांपर्यंतचा कालावधी लागतो. परंतु, नवीन करण्यापेक्षा जे खराब होत आहेत, त्यांचा जीर्णोद्धार करणे जास्त महत्त्वाचे. कारण त्याला जवळ जवळ १०० वर्षांचा इतिहास आणि वारसा असतो. चंद्रशेखर पाटील हे सुप्रसिद्ध आर्ट कॉन्सर्व्हेटर, बरोडा हिस्टोरियन आहेत. त्यांनी महात्मा गांधींचे पोरबंदर येथील घर रिस्टोर केले. शिवाय रवींद्रनाथ टागोर यांचे घर, जीर्ण झालेली पेशवेकालीन पैठणी, जहांगीर बादशहाचे अस्सल फर्मान यांसारखा अनेक मौल्यवान ठेवा जतन केला, तर साॅफ्टवेअर डेव्हलप करणारे रोहित आवडीमुळे या क्षेत्राकडे वळले. या सर्व प्रक्रियेसाठी वन विभागाचे सहकार्य असते. वाईल्ड लाईफ ॲक्ट १९७२ च्या काही सब सेक्शनमार्फत विशेष परवानगी घेऊनच या गोष्टी होतात.

काय आहे टॅक्सिडर्मी

इजिप्त संस्कृतीमध्ये मृतदेह जतन करतात, (ममीफिकेशन) त्याचेच आधुनिक रूपांतर म्हणजे टॅक्सिडर्मी. टॅक्सिडर्मीच्या माध्यमातून प्राण्यांचे अथवा पक्ष्यांचे अवशेष किंवा संपूर्ण शरीर जपून ठेवू शकतो. याचा वापर पुढील पिढीला अभ्यास, संशोधन, वन्यजीव जागरूकतेसाठी होतो. भारतात १८व्या शतकात इंग्रजांसोबत ही कला आली. एकेकाळी जगप्रसिद्ध ट्राॅफीस भारतात म्हैसूर येथे सर वॅन इंजन हे बनवायचे. याची सुरुवात जरी इंग्रजांनी केली असली तरी भारताने या कलेसाठी मोठं जागतिक योगदान केलं आहे. टॅक्सिडर्मी केलेल्या कला कृतीला ट्रॉफी असे म्हणतात.

रेवदंडा येथील ब्लू व्हेल सांगाडा

रेवदंडा, अलिबाग येथे एका नैसर्गिकरित्या मृत झालेल्या ब्लू व्हेलवर शासकीय आदेशानुसार चंद्रशेखर पाटील यांनी २००३ - ०४ साली प्रक्रिया करून त्याचे संवर्धन केले. त्यावेळी जागतिक पातळीवर त्याची मोठी प्रशंसा झाली. आज त्याठिकाणी स्थानिकांनी संग्रहालय केले आणि स्थानिकांना रोजगार मिळतो आणि अनेक लोक त्याला भेट देतात. तेव्हा या ब्लू व्हेलचे संवर्धनही झाले.

''नामशेष झालेले पक्षी व प्राणी पुढच्या पिढीला पाहता येणार नाहीत. त्यामुळे टॅक्सिडर्मी या कलेच्या माध्यमातून आपण नैसर्गिक मृत झालेल्या प्राणी वन विभागाच्या सहाय्याने प्रक्रिया करून ठेवले तर निदान पुढची १००-१५० वर्षे आपल्याला हे प्राणी बघायला मिळतील. याचा वापर मुलांना शिक्षणासाठी व संशोधनासाठी होऊ शकतो. वन विभागाने सहकार्य केल्यास आपल्या इथे एक सुंदर संग्रहालय होऊ शकते, त्यासाठी आमचा प्रयत्न चालू असल्याचे टॅक्सिडर्मिस्ट रोहित खिंडकर यांनी सांगितले.'' 

Web Title: Even after death the animal can be seen for 100 years Know the feature of art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.