पाच वर्षांनंतरही पाणीप्रश्न रखडलेलाच
By admin | Published: June 1, 2017 01:28 AM2017-06-01T01:28:04+5:302017-06-01T01:28:04+5:30
नगरपालिकेच्या हद्दीत येऊनही पाच वर्षांनंतरही हद्दवाढीतील उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे टँकरने
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : नगरपालिकेच्या हद्दीत येऊनही पाच वर्षांनंतरही हद्दवाढीतील उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. बारामती एमआयडीसी परिसरातील प्रभाग क्र. ४ ब मधील परिसर रुई गावठाण पिण्याच्या पाण्याच्या मूलभूत सुविधेपासून वंचित आहे. तीन दिवसांतून एकदा या परिसराला पाणी मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे हा परिसर तहानलेलाच असल्याचे चित्र आहे.
एमआयडीसीलगतचा हा परिसर आहे. या भागात विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्पांसह शैक्षणिक संकुल आहेत. त्यामुळे विविध आंंतरराष्ट्रीय प्रकल्पांमधील अधिकारी, कामगार वर्ग या ठिकाणी वास्तव्यास आहे. शिक्षणासाठी आलेले अनेक विद्यार्थी देखील या भागात वास्तव्यास आहेत. उच्चभ्रू वर्गापासुन मध्यमवर्गाचे प्रमाण येथे अधिक आहे. त्यामुळे हायफाय बंगल्यांपासुन सदनिकांचे मजले येथे पहावयास मिळतात. रुई गावठाण, बयाजीनगर, विठ्ठलनगर, रुई गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. तीन दिवसांतुन एकदाच पाणी मिळत असल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे.
दोन तीन दिवसांतुन एकदाच पाणी मिळते. त्यामुळे मिळालेल्या पाण्याचा साठवुन काटकसरीने वापर करावा लागतो. नागरिकांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. गावाला स्मशानभूमी देखील नाही. उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते, असे येथील नागरिक हनुमंत चौधर यांनी सांगितले. तर अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पाणी सुटले तरी काहीजण नळाला विद्युतपंप लावतात. त्यामुळे कमी दाबाने पाणी मिळते. सुटणारे पाणीदेखील वेळेवर मिळत नाही. गावाला स्मशानभुीच नसल्याचे येथील नागरिक बापू जगताप यांनी सांगितले. तर चार पाच दिवसांतून पाणी मिळत असल्याने बोअरवेलचे पाणी वापरतो, असे येथील युवक अक्षय तावरे याने सांगितले.
या भागात रस्त्यापेक्षा अंतर्गत गटारांच्या चेंबरचे उंचवटे अधिक असल्याने वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. रुई गावठाणासह परिसरातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गावातील ओढ्याला संरक्षण कठडे बसविण्याची आवश्यकता आहे. रुई गावठाण रस्त्यावरील ओढा खोल असल्याने रात्री-अपरात्री अंदाज न आल्याने वाहनचालक ओढ्यात गेल्याने अपघात घडले आहेत. अजुनही ओढ्याला संरक्षक कठडे नसल्याने अपघाताचा धोका कायम आहे.
स्थानिक नगरसेवक विष्णू चौधर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, रुई परिसरातील यापुर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बांधली. मात्र, पाणी साठविण्यासाठी साठवण तलाव बांधलाच नाही. वाढीव हद्दीतील पाणीप्रश्न सोडविणे आवश्यक होते. मात्र, हा प्रश्न जाणीवपुर्वक सोडविण्यात आला नाही. या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. गट नं ३७२ मध्ये साठवण तलाव होणे आवश्यक होते. सध्या या परिसरासाठी तीन दिवसाला केवळ ५ लाख लीटर पाणी सोडण्यात येते. यापुर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या चुकांची शिक्षा या भागातील नागरिकांना भोगायची वेळ आली आहे. जागेच्या वादातुन स्मशानभुमीचे काम रखडले आहे. स्मशानभुमीच्या कामाचे टेंडर झाले आहे. मात्र, काम रखडले आहे. जागेचा वाद तडजोडीने मार्गी लागेल. मात्र, नगरपालीकेने त्यासाठी निर्णय घेणे आवश्यक आहे. बयाजीनगर, निर्मिती ग्रुप,अभिमन्यु कॉर्नर परीसरातील पथदिव्यांचे काम लवकरच सुरु होईल.
अरुंद रस्ता : अपघातांत वाढ
जळोची हद्दीतील सूर्यनगरी परिसरदेखील उच्चभ्रू नागरिकांचा परिसर मानला जातो. बहुतांश नोकरवर्ग या परिसरात वास्तव्यास आहे. भिगवण रस्त्यालगत असणाऱ्या सेवा रस्त्यावरुन सूर्यनगरीला जाताना सुरवातीलाच अरुंद रस्ता आहे. सुरवातीलाच रस्त्यावर मोठा खड्डा आहे. त्यामध्ये वाहनचालकांचे अनेक अपघात होतात. सध्या तात्पुरता हा खड्डा मुरुमाने बुजविण्यात आला आहे. मात्र, पावसाळ सुरु होण्यापुर्वी हा रस्ता कायमस्वरुपी बुजविणे आवश्यक आहे.
अंतर्गत रस्त्यावर देखील खड्डे पडले आहेत. सुर्यनगरी येथे भाजीमंडई सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. भाजीविक्रेत्यांकडुन नियमित शुल्क आकारणी करण्यात येते. मात्र, भाजीविक्रीसाठी ओटे शेड, अंतर्गत रस्ते निर्माण करण्याची गरज आहे. सध्या भाजीविक्रेते स्वत: हे ओटे बांधत आहेत. तात्पुरता निवारा उभारत असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात मंडईत पाणी साठते. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागते.
बारामती नगरपालिके चे पाणीपुरवठा अभियंता यू. बी. राठोड यांनी सांगितले, की ८ ते १० दिवसांपूर्वी भारनियमनामुळे तसेच तांदुळवाडी, जळोची भागात पाण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे या भागात पाण्याची समस्या निर्माण झाली होती.