सव्वातीन कोटी गुंतवले तरीही फ्लॅट, दुकानाचा ताबा न देता गंडवले; फर्मच्या संचालकांवर गुन्हा दाखल
By नम्रता फडणीस | Published: March 8, 2024 04:51 PM2024-03-08T16:51:55+5:302024-03-08T16:52:35+5:30
फ्लॅट आणि दुकानाचा ताबा न देता मांजरी येथील एका व्यक्तीची ३ कोटी २५ लाख ६ हजार ५८ रुपयांची फसवणूक केली...
पुणे : गृहनिर्माण प्रकल्पात गुंतवणूक करायला सांगून फ्लॅट आणि दुकानाचा ताबा न देता मांजरी येथील एका व्यक्तीची ३ कोटी २५ लाख ६ हजार ५८ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी हनुमंत माधव दरेकर (वय ५५, रा. निसर्ग सृष्टी, मांजरी बुद्रुक) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नितीन शंकर धिमधिमे (वय ४३), मकरंद सुधीर पांडे (वय ५५, दोघेही रा. आकुर्डी) यांच्यासह इतर अनोळखी व्यक्तींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २०१३ ते जून २०२० दरम्यान घडली.
अधिक माहितीनुसार, आरोपी नितीन धिमधिमे आणि मकरंद पांडे हे ‘फॉर्च्युन डेव्हलपर्स’ या फर्मचे संचालक आहेत. ‘फॉर्च्युन डेव्हलपर्स’च्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येत आहेत. फिर्यादी हनुमंत दरेकर हे खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहे. फिर्यादी दरेकर आणि आरोपी ओळखीचे आहेत. आरोपी धिमधिमे आणि पांडे यांनी फिर्यादी दरेकर यांना फ्लॅट व दुकाने विकत घेत पैशांची गुंतवणूक करायला सांगितले. पैसे घेऊन फ्लॅट व दुकानाचा ताबा न देता ३ कोटी २५ लाख ६ हजार ५८ रुपयांची फसवणूक केली. सहायक पोलिस निरीक्षक उमेश रोकडे तपास करीत आहेत.