आधी कारवाई करूनही जुमानले नाही; पुण्यात इमारतीवर बार, हाॅटेल दणक्यात सुरू!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 12:34 PM2023-08-30T12:34:52+5:302023-08-30T12:35:59+5:30
पुन्हा सुरू झालेल्या बेकायदेशीर रूफ टॉप हॉटेलवर गुन्हा दाखल करणार, पुणे महापालिका आयुक्तांचा इशारा
पुणे: महापालिकेने शहरातील बेकायदेशीर ९७ रूफ टॉप हॉटेलवर कारवाई केली होती; पण त्यानंतर काही दिवसांतच ही हॉटेल पुन्हा सुरू केली जात आहेत. त्यामुळे महापालिका पुन्हा सुरू झालेल्या बेकायदेशीर हॉटेलविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे.
दरम्यान, महापालिका आयुक्तांनी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात रूफ टॉप हॉटेलसह, साइड व फ्रंट मार्जिनमध्ये उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा आणि पंधरा दिवसांत त्याचा अहवाल सादर करा, असे आदेश बांधकाम विभागाच्या सर्व कनिष्ठ अभियंत्यांना दिले आहेत. त्यानुसार बांधकाम विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.
इमारतींच्या गच्चीवरील बार आणि हॉटेलविरोधात (रूफ टॉप) महापालिका कारवाई करत आहे. मात्र, हॉटेल्सना जिल्हा प्रशासनाकडून परवाने दिले जात असल्याने महापालिकेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात येणार आहे. यामध्ये अनधिकृत बार आणि हॉटेलची नावे कळवण्यात येणार असून, त्यांचे मद्य परवाने रद्द करण्याची शिफारस केली जाणार आहे. यापुढे हॉटेल्स व बार यांना परवाने देण्यापूर्वी महापालिकेचे नाहरकत पत्र घ्यावे, अशी शिफारसही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार आहे.
शहरात इमारत किंवा मॉलच्या गच्चीवर अनेक बेकायदेशीर हॉटेल सुरू आहेत. बांधकाम नियमावलीत रूफ टॉप हॉटेल्स अशी संकल्पनाच नसल्याने महापालिकेने अशा प्रकारे कोणत्याही हॉटेलला परवानगी दिलेली नाही. काही व्यावसायिकांनी कारवाईनंतर पुन्हा हॉटेल सुरू केले आहे. तर काही हॉटेलमालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.