कारवाई करूनही ‘दे धक्का’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 02:42 AM2018-08-26T02:42:03+5:302018-08-26T02:42:24+5:30
ठेकेदारांकडील बसचे ब्रेकडाऊन प्रमाण अधिक : चार महिन्यांत सव्वाचार कोटींचा दंड
पुणे : बे्रकडाऊन थांबण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून ठेकेदारांना जबर दंड केला जात असला, तरी ब्रेकडाऊन कमी झालेले नाही. उलट मागील वर्षीच्या तुलनेत ठेकेदारांच्या बसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. तर, दुसरीकडे ‘पीएमपी’ मालकीच्या बसचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. बे्रकडाऊनसाठी ठेकदारांना मागील चार महिन्यांत सुमारे सव्वा चार कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे; मात्र त्यानंतरही हे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे.
बे्रकडाऊन बसचे वाढते प्रमाणही पीएमपी प्रशासनासह वाहतूक पोलीस व पुणेकरांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. मार्गावरच बस बंद पडल्याने प्रवाशांचा खोळंबा होऊन वाहतुकीलाही अडथळा ठरतो. त्यामुळे अनेकदा मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर आता वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. ब्रेकडाऊन रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
पीएमपी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ठेकेदारांकडील बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात ठेकेदारांकडील २८२७ बस रस्त्यात बंद पडल्या होत्या. यंदा जुलै महिन्यात हा आकडा साडेतीन हजारांवर पोहोचला आहे. तर पीएमपीच्या मालकीच्या बसचे प्रमाण सुमारे २३०० एवढे
आहे.
पीएमपीच्या ताफ्यात सुमारे २ हजार बस असून, त्यापैकी ६५३ बस ठेकेदारांच्या आहेत. एकूण बसपैकी सध्या जवळपास ४०० ते ५०० बस दररोज मार्गावर येत नाहीत. त्यामध्ये जवळपास १७५ हून अधिक बस ठेकेदारांकडील आहेत. उर्वरित ४५० ते ४७५ बसपैकीही दररोज १०० हून अधिक बसमार्गातच बंद पडत असल्याने ‘पीएमपी’ची डोकेदुखी वाढली आहे. हे ब्रेकडाऊन रोखण्यासाठी प्रशासनाने ठेकेदारांना सक्त ताकीद देऊन देखभाल-दुरूस्तीकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मागील चार महिन्यांत त्यांना सुमारे सव्वा चार कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पण त्यानंतरही हे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पीएमपीच्या मालकीच्या बसेसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण तुलनेने कमी होत आहे. मागील नोव्हेंबरपर्यंत २०० बस पीपीपी तत्वावर खासगी कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आल्या होत्या. या बस नोव्हेंबर महिन्यात पुन्हा ताब्यात घेण्यात आल्या.
महिना पीएमपी बस पीपीपी भाडेतत्त्वावरील बस एकूण दैनंदिन सरासरी
एप्रिल ३४७६ ४६६ २८१५ ६७५७ २२५
मे ३०२३ ३८२ २००६ ५४११ १८०
जून २७५५ ४४१ २१०९ ५३०५ १७६
जुलै २८५० ५२१ २८२७ ६१९८ २०६
पीएमपी ब्रेकडाऊनची यावर्षीची स्थिती
महिना पीएमपी बस भाडेतत्त्वावरील बस एकूण दैनंदिन सरासरी
एप्रिल ३२३३ २९५८ ६१९१ २०६
मे २६२१ २७४२ ५३६३ १७८
जून २०८१ २८५६ ४९३७ १६४
जुलै २२९८ ३४९५ ५७९३ १९३