पुण्यात आयुक्तांच्या आदेशानंतरही सावकारकीचे गुन्हे दाखल करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ? वाचा काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 07:47 PM2022-04-23T19:47:04+5:302022-04-23T19:55:16+5:30
स्थानिक पोलीस तर सावकारकी प्रकरणात तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे ऐकूनही घेत नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली...
पुणे : सर्वसामान्य नागरिकांची खासगी सावकारांच्या जाचातून सुटका करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (amitabh gupta) यांनी काही महिन्यांपूर्वी पुढाकार घेतला होता. छळवणूक करणाऱ्या सावकारांविरोधात तक्रार देण्यासाठी एक खास हेल्पलाइन तयार करण्यात आली होती. या हेल्पलाइनला प्रतिसाद मिळत आहे. सावकारांच्या पिळवणुकीला कंटाळलेले अनेक नागरिक स्वतःहून पुढे येत आहेत. पोलिसांसोबत संपर्क साधून तक्रार देत आहेत.
परंतु पोलिसांकडूनच अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे उघड झाले आहे. स्थानिक पोलीस तर सावकारकी प्रकरणात तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे ऐकूनही घेत नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेच्या एका पथकाकडे खासगी सावकाराच्या छळवणूकीचे प्रकरण आले होते. 85 हजार रुपये व्याजाने देऊन त्या बदल्यात साडेतीन लाख रुपये सावकाराने उकळले होते. या प्रकरणात संबंधित सावकाराला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्याने 10 टक्के व्याज आकारत असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर संबंधित सावकाराविरोधात पुरावे गोळा करण्यात आले. गुन्हा दाखल करण्याससंदर्भातली कागदपत्र तयार करून पुढील प्रक्रियेसाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या निरीक्षक आणि विभागाच्या उपायुक्तांकडे पत्रव्यवहार केला होता.
मात्र संबंधित पोलीस निरीक्षकाने गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल असे म्हणत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवर माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही "दोन दिवसानंतर पाहू" असं म्हणत वेळ वेळ काढूपणा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गुन्हे शाखेचे कर्मचारी पुन्हा एकदा संबंधित सावकार आणि तक्रारदार व्यक्तीला घेऊन परिमंडळ कार्यालयात पोहोचले. तेथे पत्र देऊन त्यांचा सहीशिक्का घेतला. दरम्यान यासाठी काही तास कालावधी लोटल्यानंतर संबंधित पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन करून संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना या तक्रारीबाबत विचारणा केली. या प्रकरणात टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेतील वरिष्ठांच्या कानावर हा सर्व प्रकार घातला. सायंकाळपर्यंत तरी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता.
एकीकडे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील अवैध सावकारकी संपुष्टात आणण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन केले. त्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन देखील तयार केली. आयुक्तांच्या या आवाहनानंतर या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून नागरिक पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पुढाकार घेऊ लागलेत, मात्र स्थानिक पोलिस त्यांना दाद देत नसल्याचे यानिमित्ताने उघडकीस झाले आहे.