लसीकरणानंतरही जिल्ह्यात ७६३६ पॉझिटिव्ह, नियम पाळावेच लागतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:13 AM2021-08-12T04:13:46+5:302021-08-12T04:13:46+5:30
प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : लसीकरण झाल्यावर कोरोना आपल्या आसपासही फिरकू शकणार नाही, या गैरसमजातून बहुतांश नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम ...
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : लसीकरण झाल्यावर कोरोना आपल्या आसपासही फिरकू शकणार नाही, या गैरसमजातून बहुतांश नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम धाब्यावर बसवले आहेत. लसीकरण झाले म्हणून निष्काळजीपणे वागल्यास कोरोना विषाणूचा विळखा आपल्याला बसल्याशिवाय राहणार नाही, हे आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस घेतल्यावरही ५४६६ जणांना, तर दुसरा डोस घेतल्यानंतरही २१७० जणांना अशा एकूण ७६३६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण लसीकरणाच्या तुलनेत हे प्रमाण ०.१ टक्के असले तरी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हे नियम पाळणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात ६ ऑगस्टपर्यंत एकूण ६३,२५,५७९ जणांचे लसीकरण झाले. त्यापैकी ४६,८५,३८१ जणांचा पहिला डोस, तर १६,४०,१९८ जणांना दुसरा डोस मिळाला होता. पहिल्या डोस झाल्यावरही ५४६६ जणांना कोरोनाची लागण झाली. दुसरा डोस घेतल्यानंतरही २१७० जण कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळून आले. लस घेतल्यावरही कोरोनाची लागण झाली तरी सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे दिसू शकतात आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण नगण्य होते, असे लस उत्पादक कंपन्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड म्हणाले, ''आपल्याकडे आतापर्यंत पुरेसे लसीकरण झालेले नाही. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली तरी ती सौम्य स्वरूपाची असते. मात्र, त्यांच्याकडून इतरांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो. अमेरिकेत सर्व व्यवहार खुले झाल्यावर अचानक रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.दुसरीकडे, लसीकरणाचा वेग वाढण्याची प्रचंड गरज आहे.''
जनरल फिजिशियन डॉ. अनिकेत देशपांडे म्हणाले, ''मागील वर्षी गणेशोत्सवानंतर अचानक रुग्णसंख्या वाढली आणि पहिल्या लाटेतील उद्रेकाचा सामना करावा लागला. पहिली लाट ओसरल्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात नागरिक पर्यटनासाठी, वैयक्तिक कामांसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले. त्याची परिणती दुसऱ्या लाटेमध्ये झाली. आता सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत झाले आहेत. तिसरी लाट टाळायची असेल तर नागरिकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे.''
-----
(आकडेवारी ६ ऑगस्टपर्यंत)
लसीकरण पॉझिटिव्ह टक्का
पुणे २८,१५,०८५ ३४१३ ०.१
पिं.चिं. ११,४२,१७२ ८८ ०.०
ग्रामीण २३,६८,३२२ ४१३५ ०.२
------------------------------------------------------
एकूण ६३,२५,५७९ ७६३६ ०.१
-----------
पॉझिटिव्ह रुग्ण :
पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोसनंतर
पुणे २१६२ १२५१
पिं. चिं. ६५ २३
ग्रामीण ३२३९ ८९६
-------------------- ----------------------------------
एकूण ५४६६ २१७०