पीडित मुलीच्या आईने साक्ष फिरवल्यानंतरही अश्लील फोटो दाखविणा-यास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 06:19 AM2017-11-18T06:19:12+5:302017-11-18T06:19:35+5:30
ही घटना २१ जानेवारी २०१५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास येरवडा भागातील एका शाळेत घडली. परदेशी त्या मुलीच्या ओळखीचा होता. घटनेच्या दिवशी तो तिच्या शाळेत गेला होता.
पुणे : अल्पवयीन मुलीला मोबाइलमधील अश्लील फोटो दाखविणा-या तरुणास अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एन. सलीम यांनी ६ महिने सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त १ महिना कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे पीडित मुलीच्या आईने साक्ष फिरविल्यानंतरही न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
संजय ओमप्रकाश परदेशी (वय ३०, रा. येरवडा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत १२ वर्षीय पीडित मुलीने विश्रांतवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना २१ जानेवारी २०१५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास येरवडा भागातील एका शाळेत घडली. परदेशी त्या मुलीच्या ओळखीचा होता. घटनेच्या दिवशी तो तिच्या शाळेत गेला होता. त्यावेळी त्याने तिला बोलावून घेऊन मोबाईलवर अश्लील फोटो दाखविले. त्यावेळी मुलगी तेथून पळून गेली. तिने घडलेला प्रकार वर्गशिक्षिकेला सांगितला. त्यानंतर मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरून विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद दिली होती. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी काम पाहिले. त्यांनी ५ साक्षीदार तपासले. त्यामध्ये तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतुरकर, सहायक पोलीस निरीक्षक दीपाली मोरे यांची साक्ष आणि फोटो दाखविलेल्या मोबाइलचा तपासणी अहवाल महत्त्वाचा ठरला.