वीकेंड लॉकडाऊननंतरही बावधनमध्ये शुकशुकाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:11 AM2021-04-27T04:11:45+5:302021-04-27T04:11:45+5:30
पुणे-बंगळुरू हा मोठी वाहतूक असलेला राष्ट्रीय महामार्ग आहे. तरीही महामार्ग आणि गावातील मेन रोड आणि आजूबाजूला असणाऱ्या लोकवस्तीतून नागरिक ...
पुणे-बंगळुरू हा मोठी वाहतूक असलेला राष्ट्रीय महामार्ग आहे. तरीही महामार्ग आणि गावातील मेन रोड आणि आजूबाजूला असणाऱ्या लोकवस्तीतून नागरिक बाहेर पडताना दिसत नाहीये. काही रस्त्यांवर तर फक्त रुग्णवाहिकाच प्रवास करताना दिसत आहे.
बावधनमध्ये नेहमीच हॉटेल्स, खानावळी, पंचतारांकित क्लब किंवा गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वर्दळ असते. परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. याच कारणामुळे नागरिक स्वतःच जबाबदारीने नियम पाळत आहेत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, गावातील अंतर्गत रस्ते तसेच शिवाजीनगर रोडवरही पूर्णतः शुकशुकाट बघायला मिळाला आहे. पीएमपीही फक्त अत्यावश्यक सेवा देत असल्याने विनाकारण गर्दी टाळली जात आहे.
महाराष्ट्रात टाळेबंदी कठोर केल्यापासून परिसरात रुग्णसंख्या कमी होत आहे. त्याचबरोबर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही दररोज नवीन येणाऱ्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे सध्या तरी परिसरात कोरोनामुळे भीतीचे वातावरण कमी होत आहे.