संसार करूनही परमार्थ साध्य, ह. भ. प. बाबामहाराज सातारकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:37 AM2018-08-15T01:37:05+5:302018-08-15T01:37:19+5:30
परमार्थ करण्याकरीता संसार का सोडावा. सर्व देव हे सांसारिकच होते. गुरूदास्य हे सांसारिक व्यक्तीकराता नाही. गुरुने दिलेल्या ज्ञानाचे आचरण करणे म्हणजे गुरूदास्य आहे.
पुणे - परमार्थ करण्याकरीता संसार का सोडावा. सर्व देव हे सांसारिकच होते. गुरूदास्य हे सांसारिक व्यक्तीकराता नाही. गुरुने दिलेल्या ज्ञानाचे आचरण करणे म्हणजे गुरूदास्य आहे. संसार सोडून गुरूची सेवा करण्यात परमार्थ नाही. गुरुंचे ज्ञान आचरणात आणणे म्हणजेच त्यांची खरी सेवा आहे. गृहस्थाश्रम हे सर्वश्रेष्ठ मानले आहे, म्हणून संसारात राहून देखील परमार्थ होऊ शकतो, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे चातुमार्सानिमित्त कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रवचन गणेश कला क्रीडा मंच येथे गुरूवार, दिनांक ३० आॅगस्ट पर्यंत सुरू आहे. यावेळी त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे निरुपण करताना संसार आणि परमाथार्चे विश्लेषण केले.
बाबामहाराज सातारकर म्हणाले, वैराग्याचा अर्थ संसाराचा त्याग करणे नाही. आपल्यातील वाईट गुणांचा त्याग करणे म्हणजे वैराग्य आहे. मन चंचल आहे, अनेकदा ते भरकटते, परंतु मनावर ताबा असणे महत्वाचे आहे. बाकीच्या कर्मात बंधने असतात. धर्म आचरण शेवटपर्यंत टिकेल का हे सांगता येत नाही. म्हणून वावगा संकल्प करू नको. ते म्हणाले, सांसारिक जीवनात असताना तुम्ही मयार्दांचे उल्लंघन केले तर संसार अवघड होतो. सांसारिक जीवनाचे काही नियम आहेत, त्याचा अवलंब केला तर संसार सोपा होतो. संतांच्या दृष्टीकोनात तुम्ही आम्ही सर्व सारखेच असतो. त्यामुळे संसार त्याग करून गुरूची सेवा करू नका, तर संसारात राहून त्यांच्या विचारांचा अवलंब करा, असेही त्यांनी सांगितले.