कोरोनाच्या काळातही जोडप्यांनी उडवला लग्नाचा बार;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:11 AM2021-04-18T04:11:05+5:302021-04-18T04:11:05+5:30

पुणे : ‘विवाह’ हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक सुंदर आणि अविस्मरणीय क्षण असतो. आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत लग्नकार्य करण्याची मजा ...

Even in Corona's time, the couple blew up the wedding bar; | कोरोनाच्या काळातही जोडप्यांनी उडवला लग्नाचा बार;

कोरोनाच्या काळातही जोडप्यांनी उडवला लग्नाचा बार;

Next

पुणे : ‘विवाह’ हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक सुंदर आणि अविस्मरणीय क्षण असतो. आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत लग्नकार्य करण्याची मजा काहीशी वेगळीच असते. मात्र कोरोनाने जोडप्यांच्या आनंदात पूर्णत: विरजण पाडले. तरीही, कोरोना काळातही जोडप्यांनी लग्नाचा बार उडवलाचं! काहींचे मुहूर्त चुकले असले तरी नोंदणी पद्धतीने विवाह करून जोडप्यांनी नवीन संसाराला सुरूवात केली. वर्षभरात (मार्च 2020 ते मार्च 2021) 5228 विवाह नोंदणी पद्धतीने झाले.

बहुतांश जोडप्यांनी गतवर्षी लग्न करण्याचे नियोजन केले होते. रितसर मुहूर्त काढून मंगल कार्यालये, लॉंन्स बुक झाली होती. मात्र कोरोनाने पुण्यात प्रवेश करून विवाहामध्ये विघ्न आणले. मार्चपासून डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन लागला आणि जोडप्यांची स्वप्न भंग पावली. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मंगल कार्यालये, लॉन्स मध्ये केवळ 50 जणांच्या उपस्थितीत विवाह कार्य पार पाडण्यास परवानगी देण्यात आली होती. त्याचा काही जोडप्यांनी फायदा घेत रितसर धार्मिक व वैदिक पद्धतीने विवाह केला. मात्र, बहुतांश जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने लग्नगाठ बांधली. सध्याच्या कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे देखील पुन्हा एकदा विवाहकार्याच्या संख्येवर अजून मर्यादा आणली आहे. त्यामुळे आता विवाहावर पैसा खर्च करण्यापेक्षा नोंदणी पद्धतीने विवाह करण्यावर अनेक जोडप्यांनी भर दिला असून, कुटुंबीयांकडूनही त्यांच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जोडप्यांकडून नवीन वर्षात नोंदणी पद्धतीनेच विवाह करण्यास पसंती दिली जात आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी ते मार्च या तीनच महिन्यात जवळपास निम्मे म्हणजे 2031 विवाह नोंदणी पद्धतीने झाले. तर मार्च 2020 ते मार्च 2021 दरम्यान 5228 जोडपी विवाहबंधनात अडकली.

----------------------

जानेवारी ते डिसेंबर 2020 मध्ये 83 विवाह मुहूर्त होते. यंदाच्या वर्षी एप्रिल मध्ये 11 मुहूर्त व मे महिन्यात 14 मुहूर्त असल्याची माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे.

-----------------------------------

गतवर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मंगल कार्यालये, लॉन्स बंद होते. त्यामुळे एप्रिल-मे चे मुहूर्त हुकले. कुटुंबांनी मंगल कार्यालयांचे बुकिंग रद्द केले. त्यामुळे वर्षभरात केवळ 20 विवाहच जेमतेम पार पाडले. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाची वाढती संख्या पाहाता विवाहकार्य वगळता इतर कोणत्याच सण, समारंभांना परवानगी नाही. विवाह कार्य देखील 25 लोकांच्या उपस्थितीतच पार पाडण्यास मंजुरी दिली आहे. आत्ता खरेतर 20 एप्रिलपासून सिझन सुरू होणार होता. मात्र 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू झाल्याने या मुहूर्तांवर पाणी सोडावे लागणार आहे. पुन्हा 3 मे पासून मुहूर्त आहेत, बघू या काय निर्णय होतोय.

- प्रसाद दातार, प्रतिज्ञा मंगल कार्यालय

------------------------

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तीन महिन्यातच नोंदणी विवाहाचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. आपल्या सोयीप्रमाणे विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह केला जात आहे. या कार्यालयात नोंदणी करून होणारे विवाह हे विशेष विवाह कायद्यानुसार पार पाडले जातात. विवाहाच्या वेळी किचकट प्रक्रिया नसल्याने आणि करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विवाह समारंभासाठी उपस्थितांची संख्या नियंत्रित केली आहे. त्यामुळेही नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचे प्रमाण वाढत आहे.

-डी. ए. सातभाई, विवाह नोंदणी अधिकारी .

---------------------------

Web Title: Even in Corona's time, the couple blew up the wedding bar;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.