आंबेगावात कामाला जाणेही अवघड; दुचाकीवरून कंपनीत जाणाऱ्या तरुणाला बिबट्याची धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 19:07 IST2023-02-16T19:04:48+5:302023-02-16T19:07:15+5:30
बिबट्या धडकून पळून गेला पण तरुण जखमी

आंबेगावात कामाला जाणेही अवघड; दुचाकीवरून कंपनीत जाणाऱ्या तरुणाला बिबट्याची धडक
निरगुडसर : जवळे (ता. आंबेगाव) येथून दुचाकीवरून चाकण येथे कंपनीत कामावर जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला बिबट्याने अचानक समोरून येऊन धडक दिल्याची घटना गुरुवारी (दि. १६) रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या या सुमारास घडली. या हल्ल्यात तरुण दुचाकीसह रस्त्यावर पडल्याने जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अभिजित महादेव शिंदे (२५) हा तरुण पहाटेच्या सुमारास चाकण येथे महिंद्रा कंपनीत कामाला जात होता. वळसे मळा हद्दीत येत असताना एक बिबट्या रस्ता ओलांडताना त्याच्या दुचाकीच्या पुढच्या बाजूला धडकला. बिबट्या जोरात धडकल्याने शिंदे हा दुचाकीसह रस्त्यावर पडला. यात त्याच्या हाताला, डोक्याला, पायाला मार लागला आहे. गाडीचा आवाज झाल्याने बिबट्या पळून गेला. रस्त्यावर पडल्याने व डोक्याला मार लागल्याने शिंदे याला काही काळ नक्की काय झाले हे कळत नव्हते. पहाटेच्या सुमारास रस्त्यावर कोणीच नसल्याने शिंदे हा एका हाताने गाडी चालवत घरी पोहोचला. जवळे गावचे पोलिसपाटील यांनी याबाबत वनविभागाला माहीत दिली आहे.