मुलाने ‘सेक्स’ शब्द उच्चारला तरी आई-वडिलांची झोप उडते; गुगल नको, 'Sex Education' द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 10:50 AM2023-08-31T10:50:10+5:302023-08-31T10:50:55+5:30
लैंगिक शिक्षण हा शैक्षणिक अभ्यासक्रमाचाच एक महत्त्वाचा भाग असूनही याकडे कायम दुर्लक्ष केले गेले
नम्रता फडणीस
पुणे : एखाद्या मुलाच्या तोंडातून ‘सेक्स’ असा शब्द उच्चारला गेला तरी आई-वडिलांची झोप उडते. इतकंच काय मुलाच्या मोबाइलमध्ये नको त्या साईट्स किंवा एखादा पॉर्न व्हिडीओ आढळला तर त्या मुलाची काही खैर नाही, अशी स्थिती असते. टीव्हीवर एखादा किसिंग सीन सुरू झाला आणि मुलगा शेजारी बसला असेल तर घरातील सदस्य चॅनेलच बदलून टाकतात. हीच घर घर की कहानी असली तरी कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षणापासून मुलांच्या हातात मोबाइल सारखे खेळणे आले आणि सर्व माहिती नको त्या वयात चुकीच्या पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचू लागली आहे. याला कुठंतरी आळा बसायचा असेल तर शाळेतील मुला-मुलींना लैंगिक शिक्षण (सेक्स एज्युकेशन) देणे काळाची गरज बनली आहे, अशी भावना व्यक्त हाेत आहे.
अडगळीत गेलेल्या या विषयावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ओएमजी २’ या चित्रपटाने पुन्हा एकदा चर्चा छेडली गेली. देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाल्याने शालेय अभ्यासक्रमात ‘लैंगिक शिक्षणा’चा समावेश केला पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
लैंगिक शिक्षण हा शैक्षणिक अभ्यासक्रमाचाच एक महत्त्वाचा भाग असूनही याकडे कायम दुर्लक्ष केले गेले. तंत्रज्ञानामुळे आज माहितीचे भांडार एका क्लिकवर मुलांना उपलब्ध झाले आहे. सध्याच्या काळात इंटरनेटवर लाखोंच्या संख्येने आकर्षित करणारी पॉर्नोग्राफिक संकेत स्थळे, लैंगिक साहित्य आणि पोर्नोग्राफिक फिल्म्स याचा त्यांच्यावर भडिमार केला जातोय.
अल्पवयीन मुले-मुली वयात आल्यावर त्यांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. जसं की, मुलांना दाढी येणे, मुलींना मासिक पाळी येणे. यासह त्यांचे लैंगिक अवयव हळूहळू विकसित हाेणे हाेय. अशा काळात जर या मुलामुलींना योग्य व चांगले लैंगिक शिक्षण मिळाले नाही तर अनेक मुले चुकीच्या मार्गाने चुकीची लैंगिक माहिती घेऊन वाहवत जाण्याची शक्यता अधिक असते.
लैंगिक सुखाविषयीच्या चुकीच्या किंवा अवास्तव कल्पनांमुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्तही होऊ शकते. या गोष्टींपासून मुलांचा बचाव करायचा असेल तर त्यांना निकोप कामजीवनाची ओळख शाळेतच करून दिली पाहिजे. वयात येणे, स्त्री-पुरुष संबंध, समलिंगी संबंध (हो हेसुद्धा), आकर्षण आणि प्रेम हे सर्व घटक एकत्र येऊन त्याच्याकडे तटस्थपणे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न लैंगिक शिक्षणातून केला गेला पाहिजे. अचूक आणि वयोमानानुसार लैंगिक शिक्षण देऊन, शिक्षक आणि पालक चुकीच्या माहितीचा प्रसार रोखू शकतात. याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
लैंगिक शिक्षण देण्याने काय साध्य होईल?
- एखाद्या कृतीसाठी जबाबदारीची भावना वाढू शकते.
- गर्भधारणा आणि लैंगिक संक्रमित संसर्गासह लैंगिक प्रक्रियेच्या संभाव्य परिणामांबद्दल मुलांना ज्ञान मिळू शकेल.
- मुलांना त्यांचे शरीर, वैयक्तिक मर्यादा आणि योग्य-अयोग्य स्पर्श याविषयीचे भान येईल.
- मुलांवरील लैंगिक शोषण, अत्याचाराला आळा बसेल.
- लग्न होण्याअगोदर लैंगिक संबंध केले तर काय होऊ शकते? त्याच्या दुष्परिणामाची माहिती मिळेल.
- प्रेम करणे आणि लैंगिक संबंध यातील फरक कळेल.
- बदलांशी संबंधित भय, चिंता आणि न्यूनगंड कमी होईल.
पॉर्न पाहण्याचे वाढते प्रमाण चिंताजनक
मुलांच्या नजरेत नकळत्या वयात नको त्या गोष्टी यायला नकोत, म्हणून आई-वडील अनेक चॅनेल्स लॉक करतात किंवा त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतात. युट्यूबवर विविध प्रकारचे व्हिडीओज जसे आहेत तसेच पॉर्न आणि सॉफ्ट पॉर्न कॅटेगरीतले व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हार्ड आणि सॉफ्ट पॉर्न कंटेंट सहज उपलब्ध आहेत. व्हाॅट्सअॅपवरून मोठ्या प्रमाणावर पॉर्न क्लिप्स व्हायरल/फॉरवर्ड होतात. पॉर्न मुलांपर्यंत सोशल मीडिया, गेम्स, गुगल इमेजेस, युट्यूब अशा चोहोबाजूंनी पोहोचत आहे. हा सगळा कंटेंट इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. पॉर्न कंटेंटचा ग्राहकही आता अल्पवयीन मुले-मुली झाली आहेत. इंटरनेटवर सगळ्यात जास्त सेक्स आणि हिंसा चालते. या दोन्ही गोष्टींच्या ग्राहकवर्गात अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश आहे.
पहिली ते दुसरीत लव्ह लेटर
काही पालकांशी बोलल्यानंतर जाणवले की, शाळेतील पहिली-दुसरीमधील मुले एकमेकांना लव्ह लेटर पाठवत आहेत. या गोष्टी मुले कुठून शिकतात? तर आसपासचे वातावरण, मोबाइल, मालिकांमधून हे खाद्य सहजपणे मुलांपर्यंत पोहोचत आहे. शाळेत मुलांना काय चांगल, काय वाईट? याबरोबरच गुड टच आणि बॅड टचचे शिक्षण दिले गेले पाहिजे. काही शाळा असे उपक्रम राबवत आहेत; पण प्रत्येक वयोगटातील मुला-मुलींना समजेल, अशा भाषेत लैंगिक शिक्षणांतर्गत विविध विषयांचे ज्ञान दिले गेले पाहिजे.
...अन्यथा बूमरँग होऊ शकते
लैंगिक शिक्षण हा विषय अत्यंत नाजूक आहे, ते दिलं गेलं पाहिजे हे खरं आहे; पण हे शिक्षण प्रशिक्षित शिक्षकांकडूनच दिले गेले पाहिजे. आपल्याला समस्या ही आहे की मॅटर, डॉक्युमेंटेशन सगळं उत्तम असतं; पण त्याचे संक्रमण आणि अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने होते. आजच्या काळात लैंगिक शिक्षण खूप आवश्यक आहे; पण ते देताना काळजी घ्यायला हवी; अन्यथा बूमरँग होऊ शकते. -डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
मोबाइलचा वापर कसा करायचा?
सध्या मुला-मुलींमध्ये पॉर्न पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये ११ ते १६ वयोगटातील मुले अधिक आहेत. ही मुले पॉर्नमधील सर्व गोष्टी स्वत:शी रिलेट करतात, त्यासंबंधी चुकीच्या संकल्पना मनात बसल्याने त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. याला आळा घालायचा असेल तर मुला-मुलींना लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे. मोबाइलचा वापर कसा करायचा? याचे शिक्षणही दिले गेले पाहिजे. -डॉ. निकेत कासार, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ