हृदयक्रिया बंद पडली तरी जीव वाचविता येऊ शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:11 AM2021-08-01T04:11:22+5:302021-08-01T04:11:22+5:30

हृदयक्रिया अचानक बंद पडणे हे विविध वयोगटातील मृत्युंचे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील मृत्युचे महत्त्वाचे कारण आहे. नैसर्गिक मृत्यु ...

Even if the heart stops beating, life can be saved | हृदयक्रिया बंद पडली तरी जीव वाचविता येऊ शकतो

हृदयक्रिया बंद पडली तरी जीव वाचविता येऊ शकतो

Next

हृदयक्रिया अचानक बंद पडणे हे विविध वयोगटातील मृत्युंचे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील मृत्युचे महत्त्वाचे कारण आहे. नैसर्गिक मृत्यु होण्याच्या इतर कोणत्याही कारणापेक्षा, अचानक हृदयक्रिया बंद पडणे हे विशेषत्वाने हानीकारक आहे. कारण ते अगदी अनपेक्षितपणे घडते आणि तंदुरूस्त असलेल्या व्यक्तीला अवघ्या एका तासात प्राण गमवावे लागू शकतात. हृदयक्रिया बंद पडण्याच्या बहुतांश ८० टक्के घटना या प्रामुख्याने रूग्णालयाबाहेर, समाजात घडत असतात. बहुतांश हृदयक्रिया बंद पडण्याच्या क्रिया या ४० ते ६०वर्ष वयोगटात आणि त्यातही मुख्यतः पुरूषांमध्ये घडताना दिसून येतात. अर्थात, असा प्रकार कोणत्याही वयात आणि स्त्री पुरूष दोघांमध्ये घडू शकतो. केवळ भारतामध्ये सरासरी १० लाख लोक दरवर्षी या आजाराने पीडीत होतात, असा अंदाज वर्तवला जातो.

जेव्हा रूग्णालयाबाहेर हृदयक्रिया बंद पडते त्यांच्यातील फार कमी लोक वाचतात. मुंबई आणि पुणे या सारख्या शहरांमध्येही जिथे अधिक साक्षर आणि जागरूक लोकसंख्या आहे असा आपला दावा असतो तिथेही जर एखाद्याची हृदयक्रिया घरी असताना किंवा कार्यालयात काम करताना बंद पडली तर त्याची वाचण्याची शक्यता केवळ ०.२ टक्केच असते.

कित्येक दशकांपासून लोक हृदयक्रिया बंद पडणे याकरिता हार्ट अटॅक हा शब्द सर्रास वापरतात. हृदयक्रिया बंद पडते तेव्हा व्यक्तीच्या हृदयाचे ठोके पडणे बंद होते आणि व्यक्तीचा श्वासोच्छवासही थांबतो. हे कोणासोबतही घडू शकते, या पुर्वी हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे असे तंदुरुस्त धावपटू, ज्या व्यक्तींना स्थूलपणा, मधुमेह यासारखे जीवनशैलीशी निगडीत आजार आहेत आणि अगदी तंदुरूस्त तरूण यांचाही त्यात समावेश होतो. आपण बऱ्याचदा अचानक होणाऱ्या लोकांच्या मृत्युविषयी ऐकतो आणि ‘अऱे! काल तर तो एकदम छान होता’ असेही इतरांना बोलताना ऐकतो. खर तर जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा हृदयाच्या एका भागाचा रक्तपुरवठा थांबतो व त्यामुळे व्यक्तीला छातीत दुखू लागते. अशा रूग्णांना अतिदक्षता विभागात दाखल केले जाते. तिथे त्यांना रक्त पातळ करणारी औषधे दिली जातात. त्यांची अँजिओग्राफी केली जाते आणि स्टेंट बसवले जातात.

म्हणूनच ‘सीपीआर’ खूप महत्त्वाचा आहे. सीपीआर किंवा ‘कार्डिओ पल्मोनरी रिससीटेशन हे जीवनरक्षक कौशल्य आहे. ते आत्मसात करणे अगदी सोपे आहे. जर एखाद्या व्यक्तीची हृदयक्रिया बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली तर अशा व्यक्तीवर त्याचा त्वरीत अवलंबही करता येतो. एखाद्या रूग्णाला ‘सीपीआर’ दिल्यामुळे, त्याची हृदयक्रिया बंद पडली तरीही त्याच्या मेंदूला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा होत राहातो. त्यामुळे मेंदूचे कायमस्वरूपी होणारे नुकसान टाळता येऊ शकते. जर ‘सीपीआर’ च्या जोडीला एईडी(ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफीब्रिलेटर) किंवा शॉक मशीनचा वापर केल्यास रूग्ण बचावण्याची शक्यता निश्चितच वाढते. कधी कधी, कार्डिअँक रूग्णवाहिकेची वाट पाहात असताना ‘सीपीआर’ हा एकच उपाय असतो जो रूग्णाला मृत्यूशी लढण्यासाठीची एक संधी मिळवून देतो. जर रूग्णाची हृदयक्रिया बंद पडत असेल आणि त्याला सीपीआर मिळाला नाही, तर त्याचा किंवा तिचा जीव वाचणे अशक्य असते.

सामाजिक सीपीआऱ प्रशिक्षणाचे फळ मिळणार कधी? अगदी मूठभर लोकांना ‘सीपीआर’चे प्रशिक्षण देऊन आपला समाज सुरक्षित झाला असे आपण म्हणू शकणार नाही. त्यामुळे पंधरा वर्षावरील वयाच्या सर्वच लोकांना हे कौशल्य शिकवले जाणे गरजेचे आहे.

कोणाचाही जीव वाचवण्यासाठी एखाद्याला प्रशिक्षित करण्यासाठी साधारण ९० मिनिटांचा कालावधी लागतो. काही देशांमध्ये ह्या गोष्टीची पूर्तता यशस्वीरीतीने करण्यात आलेली आहे. अशा देशांतील समाजात हृदयक्रिया बंद पडण्याच्या त्रासाने पीडीत असलेल्या व्यक्तींचा जीवनदर हा ५० टक्के इतका उच्च असल्याचे समोर आले आहे.

हृदयगती थांबत असताना त्या व्यक्तीला जिवंत राहाण्यासाठी मदत करण्याचा पाया रचणाऱ्यांपैकी एकाविषयी जाणून घेऊ या. अमेरिकेतील वॉशिंग्टन मधील २५ लाख लोकसंख्येच्या ‘किंग कॉऊंटी’ या शहरामध्ये हृदयक्रिया थांबणे या विकारातील जीवनदर ६० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. (दोन शतकापूर्वी तो २६ टक्के इतका होता) हृदयक्रिया बंद पडण्यासंदर्भात जगात जी आकडेवारी उपलब्ध आहे त्या बहुधा हा सर्वाधिक दर आहे. हे गेल्या काही वर्षातील प्रयत्नांचे नव्हे तर सुमारे अर्धशतकी प्रयत्नाचे फलित आहे. कारण पन्नास वर्षांपुर्वी त्यांनी सीपीआरचे प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली होती. पीडीत व्यक्तीला वाचवण्यासाठी एक सुनियोजित यंत्रणा उभी राहणे गरजेचे असते.

तातडीने प्रतिसाद देणाऱ्या व्यक्ती जसे की पोलिस कर्मचारी, अग्निशामक दल, क्रीडा जिमखाना, गोल्फ कोर्स आदी ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्ती , शाळा आणि महाविद्यालयातील कर्मचारी, रेल्वे कर्मचारी आदि व्यक्तींना याचे प्रशिक्षण प्राधान्याने दिले पाहिजे. कारण त्यांच्या परिसरात किंवा क्षेत्रात हृदयक्रिया बंद पडत असलेल्या रूग्णांपर्यंत तेच प्रथमतः पोहोचू शकतात. जशी जागरूकता वाढत जाईल तशी याविषयीची चर्चा वाढत जाईल. आणि एकदा चांगल्या चर्चेला सुरूवात झाली की पुन्हा मागे वळून पहावे लागणार नाही.

भारतीय म्हणून आपली एक महाशक्ती आहे ती म्हणजे आपली लोकसंख्या. रूग्णालयाबाहेर हृदयक्रिया बंद पडण्याच्या घटनांमध्ये, बघे गोळा होण्याची शक्यता अधिक असते. आपल्या देशातील हृदयक्रिया बंद पडणे या विकारातील जीवनदर वाढवण्यात या. घटकाचा आपण उपयोग केला पाहिजे.

एका रात्रीत बदल होत नाही. पण बदल घडवणे शक्य असते. त्यामुळे स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या साथीने, स्थानिक हृदयरोग विशेषतज्ज्ञांची मदत घेऊन समाज प्रशिक्षण देणे, लहान मोठ्या ऑनलाईन कार्यशाळा संचालित करणे याच्या मदतीने आपण जास्तीत जास्त लोकांना सीपीआरचे प्रशिक्षण देण्याचा मार्ग अवलंबू शकतो. हृदयक्रिया बंद पडण्याच्या त्रासातून कुणीही जात असेल तर त्याचे प्राण वाचवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केल्याशिवाय कोणाचाही मृत्यू होऊ नये.

Web Title: Even if the heart stops beating, life can be saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.