एक सदस्यीय प्रभाग असला तरी आम्हीच विजयी होऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:15 AM2021-08-26T04:15:09+5:302021-08-26T04:15:09+5:30
पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग जाहीर झाल्यावर शहरातील सर्वच राजकीय पक्ष प्रमुखांनी संमिश्र प्रतिक्रिया देत, आमचा ...
पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग जाहीर झाल्यावर शहरातील सर्वच राजकीय पक्ष प्रमुखांनी संमिश्र प्रतिक्रिया देत, आमचा विजय निश्चित असल्याचे सांगितले आहे़ यामध्ये भाजपने हा निर्णय हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत, महाविकास आघाडीला हा निर्णय फायदेशीर ठरणार नसल्याचा दावा केला आहे़
याबाबत भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी, एक, दोनची अथवा चारची प्रभाग रचना झाली तरी आगामी निवडणुकीनंतर महापालिकेत पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असल्याचे सांगितले आहे़ आजचा निर्णय हा महाविकास आघाडीने राजकीयदृष्टीने घेतला आहे़ आमच्या काळात विकासाच्यादृष्टीने प्रभाग रचना करून चार नगरसेवकांचा एक प्रभाग अशी रचना करण्यात आली़ परंतु, या प्रभागरचनेत लोकांच्या हिताचा व विकासाचा विचार केलेला नाही़ तरीही भाजपने केलेल्या विकासकामांच्या जोरावर भाजप पुन्हा सत्तेत येईल व पुणेकरांची पसंतीही भाजपलाच राहील असेही ते म्हणाले़
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी, आगामी निवडणुकीच्या कामात दिरंगाई होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने जुन्या निर्णयानुसार एक सदस्यीय प्रभागाचा आदेश काढला आहे़ पण पुढील आठवड्यात राज्य सरकार वटहुकूम काढून दोन सदस्यांचा प्रभाग जाहीर करेल़ दरम्यान, प्रभाग एकचा होऊ अथवा दोनचा तो राष्ट्रवादी काँग्रेसला फायदेशीरच आहे़ पुणेकर भाजपच्या कारभाराला कंटाळली असल्याने, महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़
काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी, एक सदस्यीय प्रभाग रचना ही कार्यकर्त्यांना न्याय देणारी असल्याचे सांगितले़ ज्या कार्यकर्त्याची पकड त्याच्या मतदारसंघात आहे, अशा गरीब कार्यकर्त्यांनाही निवडणूक लढविता येणार आहे़ एक सदस्यीय प्रभागामुळे शहरातील विकासाला विशेषत: त्या प्रभागातील विकासाला नक्कीच चालना मिळेल असेही ते म्हणाले़
शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे यांनी, एक सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगून, या निर्णयामुळे शहरात शिवसेनेचे संख्याबळ नक्की वाढेल, असा विश्वास व्यक्त केला़ शहरात एक सदस्यीय प्रभाग असताना शिवसेनेचे २२ नगरसेवक होते, त्यामुळे यावेळीही पक्षाला याचा मोठा फायदा होणार आहे़ चार सदस्यीय प्रभागात काम करताना हद्दीच्या अनेक अडचणी येत होत्या़ पण आता एक सदस्यीय प्रभागात काम मार्गी लागून विकासाला चालना मिळणार आहे़