चित्र काढले तरी भावना दुखावतात
By admin | Published: May 6, 2017 02:38 AM2017-05-06T02:38:52+5:302017-05-06T02:38:52+5:30
‘व्यंगचित्र या माध्यमाची रसिकांना जाण होणे आवश्यक आहे. पण सध्या चित्र काढायचे म्हटले तरी भावना दुखावल्या जातील, याची
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘व्यंगचित्र या माध्यमाची रसिकांना जाण होणे आवश्यक आहे. पण सध्या चित्र काढायचे म्हटले तरी भावना दुखावल्या जातील, याची भीती वाटते. बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रांतून अनेक नेत्यांवर आसूड ओढले. पण त्या वेळी कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत. व्यंगचित्राच्या माध्यमातून अशीच निकोप रसिक भावना विकसित व्हायला हवी,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त कार्टुनिस्ट कंम्बाइन व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, व्यंगचित्रकार चारुहास पंडित आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाला सनईवादक नसल्याचे पाहून फडणीस यांनी सनईवादकाचे व्यंगचित्र रेखाटले. त्याचवेळी सनईचे रेकॉर्डींग वाजविण्यात आले. यावर फडणीस यांनी चित्रालाही सूर आल्याची टिप्पणी केली. व्यंगचित्रकार भटू बागले यांनी या वेळी गोगावले यांचे व्यंगचित्र रेखाटून त्यांना भेट दिले.
फडणीस म्हणाले, ‘‘व्यंगचित्रासाठी मला शब्द वापरण्याची कधी गरज पडली नाही. व्यंगचित्र हे माध्यम चित्रकलेतूनच पुढे आले आहे. सर्व प्रकारचे विचार व्यक्त करण्याचे सामर्थ्य त्यात आहे. केवळ राजकीय टीकाचित्र म्हणजे व्यंगचित्र नाही. निखळ आनंद देणारे प्रबोधनपर करणारे चित्र म्हणजे व्यंगचित्र.
या माध्यमाची रसिकांना जाण होण्याची गरज आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून निकोप रसिक भावना विकसित व्हायला हवी. त्यादृष्टीने व्यंगचित्राचे शैक्षणिक मूल्य मोठे आहे. ज्ञानशाखा आधी आल्या व त्यानंतर महाविद्यालये, विद्यापीठे आली. त्यामुळे आज ना उद्या
यामध्ये व्यंगचित्र कलेची दखल घ्यावीच लागेल, असे फडणीस यांनी नमूद केले.
उद्घाटनानंतर चारुहास पंडित, घनश्याम देशमुख, विवेक प्रभुकेळुस्कर आणि वैजनाथ दुलंगे यांनी व्यंगचित्रांच्या विविध प्रकारांवर सचित्र मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थितांनीही आपली व्यंगचित्र काढून घेण्याचा आनंद लुटला.