पावसाळा आला तरी वाडीवर टँकर मिळेनात!
By admin | Published: May 23, 2017 05:29 AM2017-05-23T05:29:36+5:302017-05-23T05:29:36+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी गावांची मागणी आल्यास २४ तासांत टँकर देण्याचे जाहीर आश्वासन देऊनही टँकर, टँकर करण्याची वेळ भोर तालुक्यातील गावांवर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : जिल्हाधिकाऱ्यांनी गावांची मागणी आल्यास २४ तासांत टँकर देण्याचे जाहीर आश्वासन देऊनही टँकर, टँकर करण्याची वेळ भोर तालुक्यातील गावांवर आली आहे. मागणीनंतर पहिला टँकर दीड व दुसरा तब्बल अडीच महिन्याने सुरू झाले, मात्र तरीही अजून अनेक गावे वाड्या-वस्त्या टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.
तालुक्यात पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे १० गावे व १३ वाड्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी भोर पंचायत समितीकडे सादर केले होते. त्यानंतर २० दिवसांपूर्वी २ व दोन दिवसांपूर्वी १ टँकर व २ पिक-अप अशा तीन टँकर व २ पिक-अपने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे.
भाटघर व नीरादेवघर या दोन्ही धरण भागातील गावात वीसगाव महुडे खोऱ्यात व महामार्गावरील काही गावांत तीव्र पाणीटंचाई आहे. २७ एप्रिलला शिरवली हि. मा व चौधरीवस्ती, गुढे, निवंगणसाठी एक टँकर आणि त्यानंतर १० दिवसांनी भुतोंडेला एक अशा दोन टँकरला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर सुमारे २३ दिवसांनी शिळींब, राजिवडी, उंबार्डेवाडी, शिरगावची पातरटेकवाडी यांना एक टँकर व पसुरे धनगरवाडा यांना एक पिक-अप जीप, जयतपाड हुंबेवस्ती व डेहेण जळकेवाडी यांना एक पिक-अप जीपने पाणीपुरवठा सुरू आहे. भुतोंडे येथील टँकरनेच गृहिणी व खिळदेवाडी या गावांना पाणी देण्यास जोडण्यात आले आहे.
भोर तालुक्यातील पाणीटंचाई असलेली म्हसरबुद्रुकची धनगरवस्ती, दुर्गाडीची मानटवस्ती यांना टँकर मंजूर झाला असून लवकरच सुरू होईल, असे भोर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. महामार्गावरील मोरवाडीचे पाचलिंगे म्हसरबुची धनगरवस्ती, दुर्गाडीची मानटवस्ती, अभेपुरी, रायरीची धारांबेवाडी, वरोडी खुर्द, वरोडी बुद्रुक, वरोडी डायमुख अशिंपीची या गावांना व वाड्या-वस्त्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव सादर केले आहेत.