आमचा बालेकिल्ला नसला तरी बारामतीत आम्ही जिंकणारच - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 05:21 PM2022-09-25T17:21:13+5:302022-09-25T17:21:23+5:30
लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचे एनडीएचे लक्ष्य असून त्यामध्ये बारामतीचाही समावेश आहे
पुणे : बारामती हा पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असला तरी आमचाही किल्ला आहे. या भागात दलित आणि धनगर समाजाची चांगली मते आहेत. महादेव जानकर यांच्या विरोधात सुप्रिया सुळे अत्यंत कमी फरकाने निवडून आल्या. त्यामुळे बारामती आम्हीही जिंकू शकतो, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचे एनडीएचे लक्ष्य असून त्यामध्ये बारामतीचाही समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले.
मॉरिशिअस मराठी मंडळी संस्थेतर्फे मंगळवारी (२७ सप्टेंबर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण मॉरिशिअसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंग यांच्या हस्ते होणार आहे. त्या कार्यक्रमाला मी जात आहे, असे सांगत भोर येथील फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाने हा पुतळा तयार केला आहे. मॉरिशिअसमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण होणे ही आंबेडकरी समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी, आरपीआयचा ६५ वा वर्धापनदिन ३ ऑक्टोबर रोजी भुसावळ येथे होणार असून या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील उपस्थित राहणार आहेत. पक्ष व्यापक करण्यासाठीचा संकल्प या कार्यक्रमात करणार आहे. ११ डिसेंबर रोजी निलंगा येथे ओबीसी मेळावा होणार आहे. ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे, यासह जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. जातीनिहाय जनगणनेमुळे जातीवाद वाढेल, ही असा विचार करणे चुकीचे आहे असे सांगितले.
देशाला नाही पक्षाला जोडण्याची गरज..
राहुल गांधींनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा ही काँग्रेस अजून कमकुवत करणारी असून त्याचा काँग्रेस पक्षाला फायदा होणार नाही, अशी टीका रामदास आठवले यांनी केली. सत्तेत असताना त्यांच्याकडे देश जोडण्याची कोणतीही भूमिका नव्हती. भारताला जोडण्यासाठी आम्ही काम करत असून त्यांनी त्यांच्या पक्षाला जोडावे. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारत नाहीत, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना म्हणजे ‘बच्चों का खेल नहीं’ असा टोलाही त्यांनी लावला.