डोक्यावर मोर घेतला तरी अंगातील वाघाला जागे करू नका; वसंत मोरेंचा पुणे महापालिकेला इशारा
By श्रीकिशन काळे | Published: May 2, 2023 11:18 AM2023-05-02T11:18:57+5:302023-05-02T11:19:12+5:30
मोरांचे पंख अंगावर लावून मोरे यांनी नदी वाचवा, टेकडी वाचवा, पुणे वाचवा, झाडं वाचवा, असा नारा
पुणे : पुणे महापालिकेने नदी पुनरुज्जीवन प्रकल्प योग्यरित्या राबवावा, कारण पुणेकर लोकं परवा चिपको आंदोलनात हजारोंच्या संख्येने नदीपात्रात आली होती. तीच पावले पालिकेत येऊ शकतात, त्यामुळे पालिकेने आता गेटवर बंदोबस्त वाढवायला हवा, माझी प्रशासनास विनंती आहे सुधरा आणि झाडांची कत्तल थांबवा अन्यथा डोक्यावर जरी शांततेचे प्रतीक असणारा मोर घेतला असला तरी एक लक्षात ठेवा आंगातील वाघाला जागे करू नका. असा इशारा मनसेचे नेते वसंत मोरे यांनी पालिकेला दिला आहे. मोरांचे पंख अंगावर लावून मोरे यांनी नदी वाचवा, टेकडी वाचवा, पुणे वाचवा, झाडं वाचवा, असा नारा दिला.
नदी पुनरुज्जीवनात महापालिका हजारो झाडे तोडणार आहे. एकीकडे अहवालात झाडांचा मुद्दा न टाकता दुसरीकडे तोंड करायची आणि म्हणायचे की आम्ही झाडं तोडणार नाही. हा दुटप्पीपणा महापालिका करत आहे. पण आता या पालिकेच्या विरोधात राजकीय नेतेही उतरत आहेत. नदी पुनरुज्जीवन प्रकल्प चुकीच्या पद्धतीने राबवला जात आहे. अगोदर नदी स्वच्छ हवी, त्यावर काम न करता केवळ सुशोभीकरणाला प्राधान्य दिले जात आहे, असा नदीप्रेमींकडून आरोप आहे. यावर निषेध म्हणून चिपको आंदोलन झाले. या आंदोलनात हजारो पुणेकर आले होते. तोच हजारो पुणेकरांचा व्हिडिओ वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर मोरे यांनी आपले मत मांडले आहे. ते म्हणतात, पुणेकर हजारोंच्या संख्येने नदी पात्रात आले आहेत. हीच पावले पालिकेच्या दरवाज्यावर येऊ शकतात. त्यामुळे पालिकेने आता गेटवरील बंदोबस्त वाढवावा.'''
वसंत मोरे यांनी देखील मोरांचे पिसे अंगावर घेऊन आम्हाला वाचवा असा संदेश देऊन झाडं, नदी, टेकडी वाचलीच पाहिजे असा नारा दिला. त्यांनी मोरपंख लावून चिपको आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे गेले होते.