डिजिटल युगातही अर्धे वीजग्राहक रांगेतच; 'हे' आहेत ऑनलाईन वीजबिल भरण्याचे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 03:01 PM2023-07-24T15:01:50+5:302023-07-24T15:02:40+5:30
ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठीचे पर्याय...
बारामती (पुणे) : डिजीटल इंडियात व महाराष्ट्रात तब्बल ४९ टक्के वीजग्राहक आजही पारंपरिक पद्धतीने स्वत:चा वेळ व पैसा वाया घालत रांगेत उभे राहून वीजबिल भरत असल्याचे वास्तव आहे. बारामती परिमंडलात शेतीचे ग्राहक वगळता २० लाख ३४ हजार ग्राहक आहेत. ज्यापैकी १२ लाख ८४ हजार ग्राहकांनी जून महिन्यात वीजबिल भरले. त्यातील ६ लाख ५६ हजार २४४ (५१ टक्के) ग्राहकांनी विविध ऑनलाईन पर्यायाद्वारे घरबसल्या वीजबिल भरले व ऑनलाईन सूट व पेट्रोलचे पैसे वाचविले. तर ६ लाख २९ हजार ६५५ ग्राहकांनी उन्हातान्हात घराबाहेर पडून, स्वत:चा वेळ व पेट्रोलचा खर्च करुन वीजबिल भरले. त्यातील कुणी वीजबिल भरण्यासाठी स्वत:च्या कामावर उशिरा पोहोचते तर कुणाला अर्धा दिवसाची रजा टाकावी लागते. यातून दुहेरी नुकसानच होते.
आज सर्व शहरात, गावांत 4G नेटवर्क पोहोचले आहे. स्मार्टफोन सुद्धा खिशात आहेत. मात्र त्याचा वापर फक्त सेल्फी पुरता न करता दैनंदिन कामे सुकर करण्यासाठी केला तर महावितरणचे वीजबिल वेळेआधी व घरबसल्या भरणे सहज शक्य आहे.
ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठीचे पर्याय :-
1. संकेतस्थळ : www.mahadiscom.in नावाने महावितरणचे संकेतस्थळ असून, या संकेतस्थळावर वीजबिल भरण्याची जलद सुविधा उजव्या कोपऱ्यात दिली आहे. १२ अंकी वीजग्राहक क्रमांक टाकून वीजबिल सहज भरता येते. गुगलवर view & pay bill सर्च केल्यास पैसे भरण्यासाठी wss सुविधा वापरता येते. सर्व प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांच्या नेटबँकिंग, क्रेडिट व डेबिट कार्डचा वापर वीजबिल भरण्यासाठी करता येतो.
2. मोबाईल ॲप : प्ले स्टोअर व ॲप स्टोअरवर महावितरण मोबाईल ॲप उपलब्ध आहे. हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन आपण एकापेक्षा जास्त वीजजोडण्या जगाच्या पाठीवर कोठूनही हाताळू शकतो. यात वीजबिल पाहण्याची, भरण्याची, वीजपुरवठा व वीजबिलासंबंधी तक्रारी नोंदविण्याची सोय आहे. नावात बदल, वीजभार कमी जास्त करण्याची मागणी सुद्धा यातून नोंदवता येते. लाखो ग्राहकांनी हे ॲप लाऊनलोड केले आहे.
3. UPI Gateways : BHIM, Gpay, PhonePay, Paytm यांसारखे UPI ॲप आपल्या बँक खात्याशी संलग्न करुन वीजबिल सुलभरित्या भरता येते. एकदा यावर वीजबिल भरले तर पुढचे वीजबिल तयार होताच हे ॲप आपल्याला ते भरण्याची सुचना देतात.
4. QR कोड : गेल्या काही वर्षांपासून वीजबिलावर क्यूआर कोड (Quick Response code) छापला जात आहे. बिलावरील क्यूआर कोडला युपीआय ॲपद्वारा स्कॅन केले की वीजबिल भरता येते. येथे वीजबिलाची रक्कम टाकण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन वीजबिल भरण्याचे फायदे :- ऑनलाईन वीजबिल भरण्याचे अनेक फायदे आहेत. इथे वेळेसोबत इंधनाची बचत होते. वरील पर्यायाद्वारे एका क्लिकवर बील भरता येते. वीजबिल तयार झाल्यापासून पहिल्या सात दिवसांत वीजबिल भरले तर जवळपास १ टक्का सूट मिळते. याशिवाय ऑनलाईन भरल्यामुळे अतिरिक्त पाव टक्का असे मिळून सव्वा टक्क्यांची बचत करता येते.
महावितरण मोबाईल ॲप लिंक-
https://play.google.com/store/apps/details?id=com.msedcl.app