एकदा गुन्हा दाखल होऊनही फरक पडला नाही; तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या
By नितीश गोवंडे | Published: March 1, 2024 04:05 PM2024-03-01T16:05:51+5:302024-03-01T16:08:44+5:30
मुलीने तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता, तसेच वेळोवेळी तिच्या वडिलांनी फोनही केले, मात्र त्याला फरक पडत नव्हता
पुणे: तरुणीचा पाठलाग करुन विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतरही पुन्हा चोरून तरुणीचा पाठलाग केला. तसेच तरुणीचा घरापर्यंत पाठलाग करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलून पुन्हा विनयभंग केला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
याबाबत हडपसर येथे राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून वेदांत उद्धव झुंजुर (२३, रा. तुकाईदर्शन, हडपसर) याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने यापूर्वी पीडित तरुणीचा पाठलाग करुन विनयभंग केला होता. याप्रकरणी मुलीने फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्याच्यामध्ये कोणताही फरक पडला नाही. त्याने वेळोवेळी फिर्यादी व तिच्या वडिलांना फोन केले. बुधवारी (दि. २८) रात्री नऊच्या सुमारास सुमारास फिर्यादी घरी जात असताना आरोपीने तिचा चोरून पाठलाग केला. तरुणी तिच्या राहत्या बिल्डिंगजवळ आल्या असता आरोपी तिच्या पाठीमागे आला. यावेळी फिर्यादीच्या वडिलांनी आरोपीला याचा जाब विचारला. त्यावेळी त्याने तुमची मुलगी मला खूप आवडते, मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे. असे म्हणून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत विनयभंग केला. यानंतर मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अब्दागिरे करत आहेत.