"शरद पवारही मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत, ते फडणवीसांनी दिलं होतं; आघाडीला तेही टिकविता आलं नाही.."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 12:59 PM2021-05-07T12:59:26+5:302021-05-07T14:08:47+5:30
तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांनाही ते जमले नाही...
पुणे : मराठा आरक्षणाची मागणी १९८५ पासून केली जात आहे. तेव्हापासून आजवर झालेल्या मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याची धमक दाखविली नाही. तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि ५० वर्षांची राजकीय कारकीर्द असलेले शरद पवारही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. ते आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी देण्याची हिम्मत दाखविली. ते सुद्धा या सरकाराला टिकविता आले नाही. त्यामुळे आगामी काळात आरक्षणाच्या मुद्द्यावर नेमके काय करणार आहात असा सवाल माजी खासदार आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केला आहे.
संजय काकडे यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काकडे म्हणाले, मुख्यमंत्री मुंबईचे आणि उपमुख्यमंत्री पुण्याचे तरीही याच दोन शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव का वाढला? हे नेते फक्त सभागृहात बसून बैठका घेतात. दवाखाने, संस्था यांना भेटी देऊन मदत केली पाहिजे. अद्यापही तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी नाही. मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही. प्रत्येकजण वेगवेगळ्या घोषणा करीत असतो. पहिल्या लाटेत एवढा आकडा वाढला नव्हता. यावेळी ग्रामीण भागातही संसर्ग वाढलाय. शहरी भागात पूर्णपणे लसीकरण करा असे काकडे म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. पवारांनी सर्व पक्षांना सोबत घेऊन समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. आयएएस अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या पाहिजेत. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडावे, लोकांमध्ये फिरावे तेव्हा खरी परिस्थिती समजेल. लॉकडाऊनमुळे लोकांचे हाल सुरू आहेत. औद्योगिक पट्ट्यात पूर्ण लसीकरण केल्यास रोजगार करता येतील. प्रत्येक गोष्टीला केंद्र सरकारला जबाबदार धरता. मग राज्याची काही जबाबदारी आहे का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्य शासनाने ठरवले तर ७-८ हजार कोटी कोरोनवर खर्च करता येऊ शकतात.
-----
शरद पवार यांची ५० वर्षांची राजकीय कारकीर्द आहे. तीन वेळा ते मुख्यमंत्री झाले. मराठा नेते म्हणून पश्चिम महाराष्ट्रातून ते उदयास आले. मराठ्यांसाठी काहीतरी करतील अशी समाजाला आशा होती. पण त्यांनाही आरक्षण देता आले नाही. कोकण, विदर्भ, मराठवाड्यात राष्ट्रवादी आहे कुठे असा प्रश्न काकडे यांनी केला.