जन्मशताब्दी वर्ष संपत आले तरी गदिमांचे स्मारक कागदावरच...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 01:16 PM2019-09-21T13:16:47+5:302019-09-21T13:19:34+5:30
एखाद्या भिकाऱ्यासारखे ‘स्मारक करा, स्मारक करा,’ किती वेळा म्हणायचे?....
पुणे : ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला १ ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रारंभ झाला. या वर्षभराच्या कालावधीत पुण्यात गदिमांचे स्मारक व्हावे, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. त्यासाठी कुटुंबाने महापालिकेशी अनेकदा पाठपुरावा केला. अखेर महापालिकेने पावले उचलत कोथरूड येथील ‘महात्मा सोसायटी’ जवळील ‘सर्व्हे नं. ६९-७०’ ही जागा स्मारकासाठी निश्चित केली. मात्र, त्यानंतर कोणतीच हालचाल झालेली नाही. गदिमा शताब्दी वर्ष संपायला केवळ काही दिवस बाकी असताना गदिमांचे स्मारक अजून कागदातून बाहेर आलेले नाही. ४२ वर्षे पुण्यात गदिमांचे स्मारक रखडलेले आहे. यासंदर्भात माहिती देताना गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर म्हणाले, गेली दोन वर्षे (२०१८-१९) मी स्वत: पाठपुरावा करून महापौर मुक्ता टिळक, नगरसेविका माधुरीताई सहस्रबुद्धे यांच्या सोबत पुण्यात फिरून अनेक जागा पाहिल्या व शेवटी कोथरूड येथील महात्मा सोसायटीजवळील सर्व्हे नं. ६९-७०ही जागा स्मारकासाठी निश्चित केली, पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची यासाठी मंजुरीही घेतली. फेब्रुवारी २०१९ ला स्मार्ट सिटी अंतर्गत ते मंजूरही करून घेतले. शताब्दीला सुरूवात होताना कोथरूड येथे झालेल्या समारंभात महापौरांनी याची जाहीर घोषणा केली. त्या वेळी आताचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी स्मारकासाठी सुरूवात म्हणून २५ लाख भाषणातच मंजूर केले होते, पण पुढे काहीच घडले नाही. महानगरपालिकेच्या गचाळ कारभारामुळे शताब्दी संपत आली तरीही स्मारक ‘जैसे थे’ अवस्थेतच आहे.
कोथरूड येथील महात्मा सोसायटी जवळील सर्व्हे नं. ६९-७० हा जवळ जवळ १0 एकराचा भूखंड ‘एक्झिबिशन सेंटर’ म्हणून राखीव आहे. यातील काही जागा गदिमा स्मारकासाठी मंजूर करण्यात आली आहे. पण पूर्ण जागेत स्मारक कुठे व किती जागेत होईल, याचा आराखडा महापालिकेकडून अजून तयार करण्यात आलेला नाही. गदिमा स्मारक कसे असावे, याचा आराखडा ही महानगरपालिकेला देण्यात आलेला आहे. शताब्दी वर्षात स्मारकाचे भूमिपूजन होऊन त्याच्या प्रत्यक्ष कामास सुरवात होईल, अशी अपेक्षा होती. पण तसे झालेले नाही. महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे १ आॅक्टोबर २०१९ रोजी शताब्दी संपताना गदिमांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागावा इतकीच मराठी रसिकांची व माडगूळकर कुटुंबीयांची माफक अपेक्षा आहे.
..........
पुणे महापालिकेकडून दिरंगाई...
एकीकडे महाराष्ट्र शासन गदिमा-पुल-फडके शताब्दी साजरी करत असताना पुणे महानगरपालिका मात्र गदिमा स्मारकाच्या बाबतीत बेफिकिरी दाखवीत आहे. पुणे या गदिमांच्या कर्मभूमीतून त्यांचे स्मारक सतत रखडावे या सारखा दैवदुर्विलास दुसरा नाही. गदिमांवर गेली ४२ वर्षे होत असलेला अन्याय आता महानगरपालिकेने दूर करावा व शताब्दी संपायच्या आत आराखडा करून भूमिपूजन तरी व्हावे हीच गदिमांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सुमित्र माडगूळ यांनी सांगितले.
............