निर्णय झाला तरी नियोजन उद्याच
By admin | Published: August 7, 2016 04:34 AM2016-08-07T04:34:44+5:302016-08-07T04:34:44+5:30
पुण्याला रोज पाणी देण्याचा निर्णय बऱ्याच कटकटींनंतर झाला असला,तरी तो प्रत्यक्ष राबविण्यास मात्र वेळ लागणार आहे. सोमवारी यासंदर्भातील नवे नियोजन करण्यात येणार असून
पुणे : पुण्याला रोज पाणी देण्याचा निर्णय बऱ्याच कटकटींनंतर झाला असला,तरी तो प्रत्यक्ष राबविण्यास मात्र वेळ लागणार आहे. सोमवारी यासंदर्भातील नवे नियोजन करण्यात येणार असून, त्यानंतरच पुणे शहराला पूर्वीप्रमाणे रोज पाणी मिळेल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
मागील वर्षी ६ सप्टेंबरला पुण्याला दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय झाला. त्या वेळीही त्यात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. वाहिन्यांमध्ये हवेचा दाब निर्माण होऊन काही ठिकाणी रोज पाणी, तर काही भागांना थेट तीन दिवसांनी पाणी मिळत होते. तीच अडचण आता पाणीपुरवठा पूर्ववत करताना निर्माण होणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.
वर्षभराच्या पाणीकपातीने त्रासलेल्या पुणेकरांना आता पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच रोज पाणी मिळणार आहे. दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय रद्द व्हावा यावरून मागील पंधरा दिवस शहरामध्ये बराच राजकीय धुरळा उडत आहे. त्यामुळे धरणात इतके पाणी असूनही आपण पाण्याला वंचितच राहणार का? असा प्रश्न पुणेकरांना पडला होता. त्यांना आता दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
- महापालिका दिवसाआड पाणी देण्यासाठी साधारण ९०० एमएलडी पाणी कॅनॉलमधून घेत होती. आता १२०० एमएलडी पाणी उचलले जाणार आहे. त्यामुळेही काही अडचणी येतील. त्याचे नियोजन करावे लागेल.
- दिवसाआड पाणी देताना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळी पाणीपुरवठा केला जात होता. त्याचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आले होते. तेही आता बदलावे लागेल.
- सर्वांना समान व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा यासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्याचा पाणीपुरवठा विभाग प्रयत्नात आहे. सोमवारपर्यंत हे नियोजन पूर्ण होईल व त्यानंतर शहराला पूर्वीप्रमाणे रोज पाणी देण्यात काही अडचण येणार नाही, असे कुलकर्णी म्हणाले.