भलेही न दिसो सृष्टी, आता कान-नाक हीच त्याची दृष्टी; दहा वर्षे झाली तरी ‘गणेश’ वावरतो रुबाबात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 12:21 PM2021-12-17T12:21:41+5:302021-12-17T12:22:03+5:30
‘तो’ पिंजऱ्यातील ओंडक्यावर, मचाणावर अतिशय लीलया वावरतो. कुठेही धडकत नाही. भलेही त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, तरीदेखील कान आणि नाक हेच त्याचे डोळे बनले आहेत.
श्रीकिशन काळे
पुणे : ‘तो’ पिंजऱ्यातील ओंडक्यावर, मचाणावर अतिशय लीलया वावरतो. कुठेही धडकत नाही. भलेही त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, तरीदेखील कान आणि नाक हेच त्याचे डोळे बनले आहेत. त्याचे नाव ‘गणेश’ असून, त्याची दृष्टी जाऊन दहा वर्षे झाली. पण, तो अंध आहे, असे त्याला पाहून अजिबात वाटत नाही. नाक आणि कान हे दोन्ही अवयव सजग ठेवून तो रुबाबात वावरतो. दृष्टी नसली तरी जगण्याची, शिकण्याची जिद्द असल्याने त्याचे आयुष्य सोपं झालं आहे. हा गणेश म्हणजे १३ वर्षांचा बिबट्या आहे. माणिकडोह बिबट निवारा केंद्रात येऊन नुकतीच त्याला १० वर्षे पूर्ण झाली. जुन्नरचे उपवनसंरक्षक जयराम गौडा आणि केंद्रातील वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर यांनी याविषयी माहिती दिली.
‘गणेश’ हा नाशिक जिल्ह्यातील एका गावात जखमी अवस्थेत रेस्क्यू केलेला बिबट्या आहे. २०११ मध्ये एका गावात चुकून तो आला होता. नागरिकांनी लाठी, बांबूने त्याला मारले आणि तो त्यात गंभीर जखमी झाला. त्याच्या दोन्ही डोळ्यांना जबर मार बसला होता. काही दिवसांनी त्याच्या एका डोळ्यामध्ये इन्फेक्शन होऊन तो निकामी झाल्याने शस्त्रक्रिया करून काढावा लागला.
दोघांची दोस्ती मस्त...
या गणेशचा एक दोस्त असून, त्याचे नाव विठ्ठल आहे. दोघेही एका पिंजऱ्यात असून, त्यांच्यात चांगली गट्टी आहे. विठ्ठल हादेखील जखमी अवस्थेत केंद्रात आणला होता. तो एका ट्रॅपमध्ये अडकल्याने त्याच्या मागील एका पायाचा पंजा कापावा लागला. कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात सोडता येत नाही, म्हणून माणिकडोह बिबट निवारा केंद्रात वन विभाग आणि वाइल्डलाइफ एसओएसचे कर्मचारी बिबट्यांचे संगोपन करीत आहेत. सध्या केंद्रात एकूण ३४ बिबटे आहेत.
जुन्नर परिसरातील मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. हा संघर्ष कमी झालेला असून, त्यासाठी नागरिकांचेही सहकार्य लाभले आहे.
डॉ. जयराम गौडा, उपवनसंरक्षक, जुन्नर वन विभाग