नागपूरचा असलो तरी पुण्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करणार नाही : नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 03:53 PM2022-09-03T15:53:40+5:302022-09-03T15:54:11+5:30
पुण्यात येईपर्यंत उपमुख्यमंत्री झालो....
पुणे :पुणे आणि नागपूर याची तुलना अनेकदा केली जाते; पण नागपूरचा विकास होत असला तरी पुण्याप्रमाणे आम्ही सर्व काही अद्याप करू शकलेलो नाही. मी आजवर अनेक हायवे, उड्डाणपूल बांधले; पण मुंबई- पुणे एक्स्प्रेस-वेनेच मला सर्वाधिक सन्मान दिला आहे. त्यामुळे मी नागपूरचा असलो तरी मी व देंवेद्र फडणवीस पुण्याच्या विकासाकडे कधी दुर्लक्ष करणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिली.
३४ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी खासदार गिरीश बापट, माजी खासदार उदयनराजे भोसले, ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी, अभिनेता सुनील शेट्टी, फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, उपाध्यक्ष कृष्णकुमार गाेयल, मीरा कलमाडी आदींची उपस्थिती होती.
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. एस.के. जैन, ज्येष्ठ दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे, ‘नॅक’चे चेअरमन डॉ. भूषण पटवर्धन व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’, तर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सिंबायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
गडकरी म्हणाले, पुण्यामध्ये अनेक क्षेत्रांतील मोठी माणसे आहेत. हीच पुण्यातील सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि हे जतन करण्याचे काम पुणे फेस्टिव्हलने केले आहे. आपली सांस्कृतिक अभिरुची, आपला इतिहास, संस्कृती, काव्य, साहित्य, नृत्य, संगीत, नाटक हे आपले वैभव आहे. हे वैभव टिकवण्याचा प्रयत्न पुणे फेस्टिव्हलने केला आहे. पुणे फेस्टिव्हल हे खऱ्या अर्थाने आपल्या देशाच्या सांस्कृतिक इतिहासामधील सोनेरी पान आहे.
पुण्यात येईपर्यंत उपमुख्यमंत्री झालो
मुख्यमंत्री असताना मला पुणे फेस्टिव्हलचे निमंत्रण आले होते; पण फेस्टिव्हलला येईपर्यंत मी उपमुख्यमंत्री झालो. म्हणूनच आता या कार्यक्रमात मी प्रथम बोलून जाण्याची परवानगी घेतली आहे. कारण कार्यक्रम संपेपर्यंत उपमुख्यमंत्र्यांचा मंत्री व मंत्र्याचा पुन्हा आमदार झालो तर काय करणार, असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून एक प्रकारे खंतच व्यक्त केली.