आजही स्त्रियांना समानतेची वागणूक नाही : लक्ष्मीकांत देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:08 AM2021-01-10T04:08:03+5:302021-01-10T04:08:03+5:30
पुणेः स्त्री शिकली, सजग झाली आणि ती पुरुषाकडून समानता मागू लागली. परंतु, स्त्रीवर मालकी हक्क गाजविण्याच्या पुरुषी मानसिकतेमुळे परिस्थिती ...
पुणेः स्त्री शिकली, सजग झाली आणि ती पुरुषाकडून समानता मागू लागली. परंतु, स्त्रीवर मालकी हक्क गाजविण्याच्या पुरुषी मानसिकतेमुळे परिस्थिती बदललेली नाही. स्त्रिया सबला झालेल्या आहेत. मात्र, आजही त्यांना अधिकार प्राप्त झालेले नाहीत. त्यांना समान वागणूक मिळालेली नाही, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
डाॅ. दिलीप देशपांडे लिखित आणि प्रियांजली प्रकाशनातर्फे प्रकाशित ''''''''त्रिरंग'''''''' या पुस्तकाचे प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी संत साहित्याचे अभ्यासक डाॅ. रामचंद्र देखणे, संगणक तज्ज्ञ डाॅ. दीपक शिकारपूर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रकाशक पराग लोणकर, लेखक डॉ.दिलीप देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, आजही स्त्रीभ्रूणहत्या तसेच घरगुती हिंसाचार, बलात्कारासारख्या घटना कानावर येतात, हे अस्वस्थ करणारे वर्तमान आहे. धर्म-जाती व्यवस्थेमुळे आजही पुरुषी मानसिकता बदलेली नाही. आरोग्य आणि शिक्षणात समानता मिळणे आवश्यक आहे.
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले की, पूर्वी चूल आणि मूल यांच्या चौकटीत असलेली स्त्री आजच्या आधुनिक युगात मोबाईल आणि माऊस वापरत असली, तरी ती स्वतंत्र आहे का, असा प्रश्न पडतो. आजही स्त्री मुक्त झाली आहे, असे आपण छातीठोकपणे म्हणू शकत नाही.
डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले की, जो कवी मनाचा असतो, तो साहित्याचे अनेक अंग हाताळू शकतो. अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन संवेदना असतात. सुख आणि दुःख हे त्याचे धृव असतात आणि या धृवांचे वर्तुळ पूर्ण होते तेव्हा कविता जन्माला येते. वाणीचा आद्य उच्चार म्हणून कादंबरीकडे पाहिले जाते.
डॉ. दिलीप देशपांडे यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका विशद केली. सूत्रसंचालन चित्रा देशपांडे यांनी केले. पराग लोणकर यांनी आभार मानले.
........