Pune: पुण्यात रस्त्यावरून चालणेही अवघड; उडवाउडवीच्या घटनेत वाढ, सामान्यांचा जातोय बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 06:00 PM2024-06-17T18:00:14+5:302024-06-17T18:01:06+5:30
पुण्यात अपघातांची मालिका सुरु असून एखाद्या रेसिंग गेमप्रमाणे गाड्या चालवल्या जातायेत, त्यामुळे घराबाहेर पडणार कसं? असा सवाल उपस्थित होतोय
पुणे : पुणे शहरात पोर्शे अपघात प्रकरणानंतर उडवाउडवीच्या घटनेत वाढ होऊ लागलीये. वाहतुकीचे नियम मोडून थेट सामान्य नागरिकांच्या अंगावर गाड्या घालण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन चार दिवसात तर दररोज एक अपघाताची घटना समोर येतीये. त्यामुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागतोय. अशा घटनामळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय. आम्ही घराबाहेर पडायचं कसं? असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित होऊ लागलाय.
पुणे पोर्शे अपघात प्रकरणात एका अल्पवयीन मुलाच्या बेभान गाडी चालवण्याने २ निष्पाप तरुणांचा बळी गेला. त्यानंतर या अल्पवयीन मुलाला एका दिवसात जामीन देण्यात आला. त्यानंतर पोलीस आणि बाल हक्क न्याय मंडळाला अनेक प्रश्न विचारल्यानंतर हे प्रकरण व्यवस्थित हाताळण्यास सुरुवात झाली. तरीही शहरातून अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. जानेवारी २०२४ पासून ते जूनपर्यंत पुणे शहरात ६७५ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये १६९ जणांचा मृत्यू झाला असून ४५८ जण जखमी झाले आहेत.
पुण्यातील अपघातांमध्ये सामान्य नागरिकांचा बळी जातोय. रस्त्यावरून चालत असताना भरधाव कारने उडवल्याच्या घटना सद्यस्थितीत समोर येऊ लागल्या आहेत. वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसतंय. रात्रीच्या वेळी तर गाडी चालवणे धोकादायक झाल्याचे चित्र आहे. पोर्शे अपघात प्रकणारनंतरही अल्पवयीन मुले बाईक, कार चालवताना आढळून आले आहेत. आता मात्र या उडवाउडवीच्या घटना दररोज घडू लागल्याने पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
धानोरी परिसरात अपघात
काल रात्री पुण्यातील धानोरी परिसरात मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने धावणाऱ्या एका चारचाकीने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षाला जोराची धडक दिली. यात रिक्षात थांबलेली चौघेजण जखमी झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर हा अपघात झाला. आरोपी कारचालकाला विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले.
पिंपरीत महिलेला जोरदार धडक
पिंपरीत भरधाव कारने पादचारी महिलेला जोरदार धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे स्वराज रेसीडेन्सीच्या समोरील रस्त्यावर बुधवारी (दि. १२) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर पोलिसांनी कार चालक असलेल्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल केला.
महिलेच्या अंगावर गाडी घातली
वडगाव - घेनंद (ता. खेड) येथे जुन्या वादाचा राग मनात धरून एका अल्पवयीन तरुणाने भरधाव चारचाकी वाहन महिलेच्या अंगावर घातल्याचा खळबळजनक प्रकार घडला. या घटनेत संबंधित महिला जखमी झाली.
चाक डोक्यावरून गेल्याने मृत्यू
एक तरुण चाकण - शिक्रापूर रस्ता क्रॉस करत असताना चाकण बाजूकडून शिक्रापूर बाजूकडे जाणारा ट्रक चालक शंकर वायभर याने त्याचे ताब्यातील ट्रक वेगात चालवून तरुणाला जोराची धडक दिली. यामध्ये ते खाली पडल्याने ट्रकचे चाक त्याचे डोक्यावरून गेले तसेच डावे पायाला गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला.
सिंहगड रोडवर अपघात
अवजड डंपरच्या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. सिंहगड रस्ता परिसरातील नांदोशी येथे हा अपघात घडला असून याबाबत हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
चांदणी चौकात बसच्या धडकेत ४ जण जखमी
चांदणी चौकात सिमेंट मिक्सर ट्रक आणि एसटी महामंडळाच्या मालवाहतूक करणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. दोन्ही वाहनांनी एकमेकांना धडक दिल्याने, वाहने दुभाजक तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आली. यात कार्गो बसच्या धडकेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत