Monsoon Update: तो आला तरी अनेकदा पाऊस न पडता चक्क ऊन पडते; मान्सून आला म्हणजे नेमकं काय होतं ?
By श्रीकिशन काळे | Published: June 7, 2024 04:29 PM2024-06-07T16:29:07+5:302024-06-07T16:29:39+5:30
मान्सून पोहचला म्हणजे पाऊस सुरू होतोच का? सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर हवामान शास्त्रज्ञांची सविस्तर माहिती
पुणे : आपल्याकडे वर्षातील ४ महिने बाष्पयुक्त वारे नैऋत्यकडून ईशान्यकडे वाहतात. या नैऋत्यकडून येणाऱ्या मौसमी वाऱ्यांना मॉन्सून म्हटले जाते. आता ह्या बाष्पयुक्त वाऱ्यात पावसासाठी जबरदस्त ऊर्जा, ताकद असेल किंवा दमदारपणा असेल, तरच पाऊस होतो. अन्यथा होत नाही. त्यामुळे मॉन्सून आला तरी अनेकदा पाऊस होत नाही, तिथे चक्क उन्ह पडते. बाष्पयुक्त ऊर्जा नसेल तर पाऊस होत नाही, अशी माहिती सेवानिवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
मान्सून पोहचला म्हणजे पाऊस सुरू होतोच का? असे अनेकदा सामान्य नागरिक प्रश्न विचारत असतात. त्यावर खुळे यांनी सांगितले की, मान्सून पोहोचला म्हणजे पाऊस झालाच पाहिजे, असे नाही. पण मान्सून पोहोचला म्हणजे मान्सूनच्या मूळ उगमापासून वि्षुववृत्तावर (दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील पेरू, कोलंबिया, ईक्वेडोर देशापासून) समुद्रावरून अंदाजे एकोणवीस (१९,०००) हजार किलोमीटर अंतर कापून वारे वाहत येतात. ते वारे तुमच्या गावापर्यंत बाष्प घेऊन येणाऱ्या वाऱ्यांचा प्रचंड प्रवाह वातावरणीय प्रणालीद्वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वि्षुववृत्त समांतर वाहता असतो. त्या वाऱ्यांचा रस्ता मोकळा झाला, असेच समजावे. म्हणून तर आपल्याकडे ४ महिने बाष्पयुक्त वारे नैऋत्यकडून ईशान्यकडे वाहतात. आता ह्या बाष्पयुक्त वाऱ्यात पावसासाठी जबरदस्त ऊर्जा, ताकद असेल, किंवा दमदारपणा असेल, तरच पाऊस होतो. अन्यथा नाही. अर्थात ही बाष्प-ऊर्जा पावसाळी हंगामात कमी होते किंवा भरली जाते.
ऊर्जा कमी झाली तर फक्त मान्सूनी बाष्पयुक्त वारेच ही ऊर्जा पुन्हा भरू शकतात. म्हणून त्यासाठी मान्सून वारे तुमच्या गावापर्यंत पोहोचणे गरजेचे असते. म्हणून तर कधी असे होते की, मान्सून आला, किंवा येऊन पुढे गेला तरी पाऊस होत नाही. मग शेतकरी गोंधळतात. त्यांना वाटतं हा काय प्रकार आहे? आला म्हणतात, अन् येथे तर चक्क उन्ह पडलेय. त्याचे उत्तर ह्या ऊर्जेत आहे, असे खुळे यांनी सांगितले.
यंदा मॉन्सून आला तरी पाऊस नाही, अशी परिस्थिती आली तर काळजी करू नका. कारण यंदा 'ला- निना' आहे, त्यामुळे बाष्प-ऊर्जास्रोताची उपलब्धता भरपूर असेल. त्यामुळे मान्सून प्रवाहादरम्यान ऊर्जा कमी झाली, तर निसर्ग आपोआप भरण्याची व्यवस्था करतो. - माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानशास्त्रज्ञ, पुणे