अखेर रिंगरोडची आखणी बदलली; भंडारा डोंगराला बोगदा नाही तर डोंगराला लागून रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:14 AM2021-09-15T04:14:14+5:302021-09-15T04:14:14+5:30
- वारकरी, आमदार व स्थानिक लोकांचा होता विरोध लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ...
- वारकरी, आमदार व स्थानिक लोकांचा होता विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने पुणे जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या तब्बल ११० मीटर रुंद रिंगरोड मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेदून किंवा बोगदा पाडून रस्ता करण्यात येणार होता; परंतु वारकरी, स्थानिक लोक आणि आमदार यांनी तीव्र विरोध केल्याने सोमवार (दि. १३) रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रिंगरोडच्या रेखांकनात बदल करण्याचे आदेश एमएसआरडीसीला दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुण्याच्या रिंगरोड प्रकल्पाला आता खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यांत रिंगरोडचे काम करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यातील रिंगरोडसाठी शंभर टक्के मोजणी पूर्ण झाली असून, दुसऱ्या टप्प्यातील पूर्व भागातील मोजणी सुरू आहे. एमएसआरडीसीच्या वतीने हा रिंगरोड बांधण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात भोर तालुक्यातील केळवडे ते मावळ तालुक्यातील उर्सेख असा हा ६८ किलोमीटरचा रिंगरोड करण्यात येणार आहे. या रिंगरोडवरून ताशी तब्बल १२० किलोमीटर वेगाने प्रवास करता येणार आहे, परंतु या रिंगरोडच्या रेखांकनाबाबत काही आक्षेप होते. यासाठीच सोमवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात अजित पवार यांनी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदारांनी काय अडचणी आहेत त्या सांगितल्या. तर प्रशासनाने कसा असेल रिंगरोड याचे सादरीकरण केले. जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी पहिल्या टप्प्यातील मोजणी पूर्ण झाली असून, लवकरच दर निश्चितीची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.
---------
आमची मागणी व पाठपुराव्याला यश
एमएसआरडीसीचा हा रिंगरोड मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगराला बोगदा पाडून रस्ता करण्यात येणार होता. परंतु याला वारकऱ्यांसह स्थानिक लोकांचा प्रचंड विरोध होता. यामुळेच रिंगरोडचे रेखांकन बदल करा यासाठी सतत पाठपुरावा केला. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीतच रिंगरोडच्या रेखांकनात त्वरित बदल करण्याचे आदेश एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच सर्व्हिस रोड आणि वडगाव चौकीतील जंक्शन पुलाच्या कामाला देखील मंजुरी दिली.
- सुनील शेळके, आमदार मावळ तालुका
-------
बैठकीत दिलेल्या आदेशानुसार अंमलबजावणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भंडारा डोंगराला बोगदा पाडून रस्ता करण्याच्या रेखांकनात त्वरित बदल करून डोंगराला कोणताही धक्का न लावता रस्ता करण्यास सांगितले आहे. तसेच इतरही अनेक सूचना केल्या असून, तशी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
- संदीप पाटील, एमएमआरडीएसीचे उपअभियंता