अखेर कचरा बकेट खरेदी बंद होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 12:56 PM2019-08-07T12:56:36+5:302019-08-07T12:58:01+5:30
दरवर्षी बहुतेक नगरसेवकांकडून दहा-दहा लाख रुपयांचा निधी केवळ ओला-सुका कचरा वेगळा करण्यासाठी नागरिकांना बकेटचे वाटप करण्यात येते.
पुणे : अनेक वर्षांपासून नगरसेवकांकडून ओला-सुका कचरा वर्गीकरणाच्या नावाखाली कचरा बकेट खरेदीवर सुरू असलेली उधळपट्टी अखेर बंद होणार आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ही बकेट खरेदीस बंदी घालण्यासंदर्भातील धोरण ठरविण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यास प्रशासनाला मान्यता दिली.
दरवर्षी बहुतेक नगरसेवकांकडून दहा-दहा लाख रुपयांचा निधी केवळ ओला-सुका कचरा वेगळा करण्यासाठी नागरिकांना बकेटचे वाटप करण्यात येते. यामध्ये गेल्या पाच वर्षांत केवळ बकेट खरेदीवर तब्बल १५ कोटी रुपयांचा खर्च केला असून, ११ लाख बकेटचे वाटप केले आहे.
यामध्ये प्रशासनाने केलेल्या सर्व्हेनुसार शहरातील एकूण कुटुंबांची संख्या लक्षात घेता, आतापर्यंत एका कुटुंबाला किमान तीन ते चार वेळा बकेटचे वाटप केले आहे. त्यानंतरदेखील नागरिकांकडून कचरा वर्गीकरणासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. यामध्ये अनेक ठिकाणी या कचऱ्याच्या बकेटचा वापर कचऱ्याऐवजी पाणी भरून ठेवणे अथवा रोपे लावण्यासाठी कुंडी म्हणून होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळेच गत वर्षी प्रशासनाने बकेट खरेदीला लगाम लावण्यासाठी काही निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला. परंतु, प्रशासनाच्या प्रस्तावाला नगरसेवकांनी विरोध केल्याने बकेट खरेदी सुरूच राहिली.
............
नगरसेवकांकडून बकेट खरेदीचा मात्र अग्रह
* याबाबत बकेट खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत असून, यासाठीच नगरसेवकांकडून बकेट खरेदीचा अग्रह धरला जात असल्याची टीका सुरू झाली. यामुळे अखेर याबाबत पक्षनेतेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
* पक्षनेत्यांनी याबाबत स्वतंत्र धोरण करण्याचे अधिकार प्रशासनाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बकेट खरेदी बंद करण्याच्या प्रस्तावासंदर्भात स्वतंत्र धोरण तयार करण्यास मान्यता देण्यात आली.