रोजच काढावी लागतेय खड्ड्यांतून वाट

By admin | Published: March 16, 2017 02:11 AM2017-03-16T02:11:24+5:302017-03-16T02:11:24+5:30

काय सांगू साहेब, रात्री बिछान्यावर पडलं ना की परत उठवत नाही. आमचं रोजचंच मरण आहे. या खड्ड्यांमधून गाडी चालविताना खूप कसरत

Every day there is a need to get rid of the pit | रोजच काढावी लागतेय खड्ड्यांतून वाट

रोजच काढावी लागतेय खड्ड्यांतून वाट

Next

पुणे : काय सांगू साहेब, रात्री बिछान्यावर पडलं ना की परत उठवत नाही. आमचं रोजचंच मरण आहे. या खड्ड्यांमधून गाडी चालविताना खूप कसरत करावी लागते. रोजच्या गचक्यांनी मानदुखी व पाठदुखीचे आजार जडलेत. खड्ड्यांमधून रोज वाट काढत प्रवाशांना स्वत:च्या जिवावर इच्छितस्थळी सोडणारा चालक हताश होऊन गाऱ्हाणे मांडत होता.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांबरोबर लगतच्या ग्रामीण भागातही बससेवा दिली जाते. मात्र, शहराचा बहुतेक भाग वगळता, उपनगरे व ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या खड्ड्यांमधून मार्ग काढताना चालकाला मोठी कसरत करावी लागत आहे, तर प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. याबाबत ‘लोकमत प्रतिनिधीं’नी विविध भागात जाऊन या रस्त्यांची पाहणी केली. बसचालक व प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.
धानोरी येथून लोहगावकडे जाताना व वारज्याच्या पुढे शिवणेकडे जाताना रस्त्यात मोठ्याप्रमाणावर खड्डे असल्याने बसचालकांना या भागातून बस चालवावी लागत आहे; तसेच सातत्याने या खड्ड्यांमधून बस जात असल्याने बस खिळखिळ्या होत आहेत व त्यामुळे सातत्याने बस बंद पडणे, पंक्चर होण्यासारखे प्रकार घडत आहेत. धानोरी ते लोहगाव या मार्गावर ‘लोकमत प्रतिनिधी’ने बसने प्रवास केला. धानोरी जकात नाक्यापुढे निकृष्ट दर्जाचा रस्ता असल्याने चालक जीव मुठीत धरून बस चालवत होता. या २ ते ३ किलोमीटरच्या पट्ट्यात १० ते २०च्या वेगाने बस चालवावी लागत होती. त्यातही प्रवाशांना खड्ड्यांमधून जाताना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, याचीही काळजी चालक घेताना दिसला.
या खड्ड्यांमध्ये बस आदळून खिडकीच्या काचा फुटणे, शॉकआॅपझर खराब होणे, बस पंक्चर होण्यासारखे प्रकार वारंवार घडत असतात. याच्या दुरुस्तीसाठी पीएमपीचा मोठ्याप्रमाणावर पैसा खर्च होत असतो. त्यातच बसमार्गावर बंद पडल्यास प्रवाशांच्या रोषालाही चालकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे रस्ते जर दुरुस्त केले, तर या सर्व समस्यांवर उपाय निघू शकेल, अशी आशा नागरिक व चालक व्यक्त करताहेत. त्याचबरोबर या मार्गावर जाण्यास येणारा चालकांचा नकार हा होकारात बदलण्यास मदत होऊ शकेल.
टीम लोकमत : राहुल गायकवाड, प्राची आमले, अतुल चिंचली, साजिया शेख

Web Title: Every day there is a need to get rid of the pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.