रस्त्यावरील कुत्र्यांसाठी बनलीय ती अन्नदाता ; दररोज रात्री २५ हून अधिक प्राण्यांना देते खायला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 07:39 PM2020-04-02T19:39:36+5:302020-04-02T19:44:35+5:30
सर्व नागरिक घरांमध्ये लॉकडाऊन असताना रस्त्यांवरील प्राण्यांचे मात्र हाल होत आहेत. त्यांच्यासाठी रस्ता हेच घर असून, त्या ठिकाणी त्यांना अन्नासाठी भटकावे लागत आहे. परंतु, एक प्राणीप्रेमी मात्र रस्त्यांवरील कुत्र्यांना अन्न देत असून, त्यांची भूक भागवत आहे.
श्रीकिशन काळे
पुणे : सर्व नागरिक घरांमध्ये लॉकडाऊन असताना रस्त्यांवरील प्राण्यांचे मात्र हाल होत आहेत. त्यांच्यासाठी रस्ता हेच घर असून, त्या ठिकाणी त्यांना अन्नासाठी भटकावे लागत आहे. परंतु, एक प्राणीप्रेमी मात्र रस्त्यांवरील कुत्र्यांना अन्न देत असून, त्यांची भूक भागवत आहे. हा उपक्रम ती रात्री करत असून, दुचाकीवर फिरून स्वारगेट, मुकुंदनगर, पर्वती, सातारा रस्ता आदी भागात श्वानांना खायला घालत आहे. तिचे नाव चैत्राली संदीप मोदी असून, श्वानांची अन्नदाता बनली आहे.
गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन झाल्याने नागरिक घराबाहेर येत नाहीत. मोकळेपणाने फिरता येत नाही. तसेच रस्त्यांवरील कुत्र्यांना त्यामुळे कोणीही अन्न देत नाही. परिणामी अनेक श्वान रात्री भुंकताना आढळून येत आहेत. त्यांची ही अवस्था पाहून चैत्राली ही आपल्या परिसरात तर अन्नदान करतच आहे. पण इतर शक्य त्या परिसरात जाऊन कुत्र्यांना अन्न देत आहे. ती हे काम गेली सात वर्षांपासून करीत आहे. पण आताच्या लॉकडाऊनमध्ये अधिक गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे तिचा परिसर सोडून इतर भागातही ती जात आहे.
चैत्राली म्हणाली, मला प्राणी खूप आवडतात. माझ्या आजोबांकडून हा गुण माझ्याकडे आला आहे. माझे बाबा देखील मला या कामात खूप मदत करतात. त्यांच्याकडून पैसे घेऊन मी अन्न देऊ शकत आहे. सात वर्षांपुर्वी मला रस्त्यावर एक जखमी कुत्रे दिसले. त्याला मी घरी आणले आणि उपचार केले. हा कुत्रा मी नंतर घरीच पाळला. त्यानंतर असे रस्त्यावर किती तरी कुत्री असतील, त्यांना अन्न मिळत नसेल किंवा मदत लागत असेल, असा विचार करून मी रात्री अन्न द्यायला सुरवात केली. रात्री वाहनांची गर्दी नसते आणि निवांत दुचाकीवर सर्वत्र जाऊन कुत्र्यांना खायला देता येते म्हणून रात्रीच मी फिरते. दररोज २५ हून अधिक कुत्र्यांना खायला देत आहे. माझ्यासोबत वीणा राठोड आणि प्रीतम पिंपळे हे देखील मला खूप मदत करतात. रात्री फिरताना पोलीसांचे खूप सहकार्य मिळते. कारण त्यांच्यामुळे मला सुरक्षित वाटते. प्रत्येकाने आपल्या शेजारील प्राण्यांना अन्न देणे आवश्यक आहे.’’
माझ्या घरामागे मोकळी जागा होती. त्या ठिकाणी मी जखमी प्राण्यांना ठेवते आणि उपचार करते. माझ्याकडे एक बैल सुध्दा आहे. तो जखमी होता. त्याला घरी आणले आणि आता तो आमच्याकडेच राहतो. श्वानांना काय खायला आवडते, ते हळूहळू समजले आणि त्यानूसार मी त्यांना खायला देते. यातून मला खूप आनंद मिळतो.
- चैत्राली संदीप मोदी, प्राणीप्रेमी