माझ्या प्रत्येक चित्रपटात दिव्यांगांना घेणार : प्रवीण तरडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 08:58 PM2019-12-09T20:58:27+5:302019-12-09T20:59:33+5:30
दिव्यांग मुले ही प्रांजल व निर्मल मनाची असून परमेश्वराला या दिव्यांग मुलांनी हरवलेले आहे.
वानवडी : दिव्यांग मुले ही प्रांजल व निर्मल मनाची असून परमेश्वराला या दिव्यांग मुलांनी हरवलेले आहे. जसे आहात तसेच रहा . आम्ही तुमच्यापर्यंत येऊ आणि प्रत्येक चित्रपटात दिव्यांग मुलगा किंवा मुलगी असेल असे आश्वासन देतो, असे चित्रपट, दिग्दर्शक व अभिनेते प्रविण तरडे यांनी सांगितले.
वानवडीतील अपंग कल्याणकारी संस्था व संशोधन केंद्र याठिकाणी जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या वार्षिकोत्सव कार्यक्रमात तरडे बोलत होते. वार्षिकोत्सहात दिव्यांग मुलांना जवळून भेटता आले व त्यांच्या कलेचा आस्वाद घेता आला. हा आनंद इतर कुठल्याही आनंदापेक्षा मोठा असल्याचे ते यावेळी बोलले.
यावेळी कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ध्यानमुर्ती रघुनाथ येमुल गुरुजी, अभिनेता प्रविण तरडे यांच्या हस्ते दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तुंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रदिप रावत, कार्याध्यक्ष अँड मुरलीधर कचरे, उपकार्याध्यक्ष सतिश जैन, सचिव लता बनकर, प्रकाश टिळेकर, शंकर जाधव, व बाप्पुसाहेब जगदाळे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या मुख्याध्यापिका शिवानी सुतार, शिक्षक, सेवक वर्ग यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक मंडळ सदस्य, मारुती राऊत उपस्थित होते. भाग्यश्री गोसावी यांनी सुत्रसंचालन केले व लता बनकर यांनी आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली.
........
वार्षिकोत्सव साजरा करत असताना पाहुण्यांच्या समोर दिव्यांग मुलांनी 'आम्ही ठाकर ठाकर व काठीन घोंगड.... या गाण्यावर नृत्याविष्कार केला तसेच योगासने, तबला वादन, सुर्यनमस्कार अशी प्रात्यक्षिके सादर केली. हे पाहून दिव्यांगांच्या कलागुणांना वाव मिळत असून दिव्यांग मुले आता कुठेही कमी नाही, असे कौतुक पाहुण्यांनी केले.
दिव्यांग मुलांनी स्वागत गीत गात कार्यक्रमाची सुरुवात केली. संस्थेचे कार्याध्यक्ष मुरलीधर कचरे यांनी प्रास्ताविकेत संस्थेच्या कायार्ची माहिती दिली. यावेळी संस्थेतर्फे दिला जाणारा 'दिव्यांग कल्याणकारी सेवा पुरस्कार २०१९' सातारा येथील आनंद परिवार चँरिटेबल ट्रस्ट यांना येमुल गुरुजी व आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेटर कुणाल फणसे यांना प्रविण तरडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.