दर तीन महिन्यांनी होणार प्रभाग सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:22 AM2017-08-12T02:22:45+5:302017-08-12T02:22:45+5:30
पारगाव, निमगाव सावा व मंगरुळ या तीन गावांचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश झाला असून तिन्ही गावांचा आराखडा मंजूर झाला आहे. तीन महिन्यांनी प्रभाग समितीची सभा घेतली जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी गुरुवारी दिले.
आणे : पारगाव, निमगाव सावा व मंगरुळ या तीन गावांचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश झाला असून तिन्ही गावांचा आराखडा मंजूर झाला आहे. तीन महिन्यांनी प्रभाग समितीची सभा घेतली जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी गुरुवारी दिले.
राजुरी - बेल्हे जिल्हा परिषद गटाची पहिली प्रभाग समिती सभा निमगाव सावा येथील ग्रामपंचायत सभागृहात झाली. या वेळी शासनाच्या विविध विभागांच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
आणे येथील सटवाईदेवी मंदिर सभागृह, कानिफनाथ मंदिर (आनंदवाडी) टेकडी पायºया, इटकाईदेवी (शिंदेवाडी) सभागृह पायºया, कापूरवाडी अंगणवाडीची नवीन इमारत, दलितवस्ती सुधार योजनेतून आणे येथे रस्ता काँक्रिटीकरण अशी कामे सुरू असून जांभळविहिरा (शिंदेवाडी) येथील सभामंडप व देशमुखवस्ती (नळावणे) येथील अंगणवाडीची मंजूर असलेली कामे जागेचे बक्षिसपत्र नसल्याने रखडलेली आहेत, अशी माहिती बांधकाम विभाग उपअभियंता होडगे यांनी दिली़ रामेश्वर मंदिर (नळावणे) येथे संरक्षक भिंत, पेमदरा येथे स्मशानभूमी बांधकाम, तसेच दलितवस्ती रस्ता काँक्रिटीकरण अशी कामे प्रस्तावित असून त्यांनाही लवकरच मंजुरी मिळेल, असे त्यांनी सांगितले़
नळावणे येथील मोरशेत पाझर तलाव दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून त्याची गळती थांबली आहे. परंतु आणे येथील पिवळगोटी पाझरतलावाचे काम अर्धवट आहे. पाणी संपल्याशिवाय काम पूर्ण करणे शक्य नाही. भोसलेवाडी व कुंभार्डी (पेमदरा) येथील जलसंधारणाची कामे बाकी असून त्यांची मुदत संपली आहे, असे पाटबंधारे विभागाचे उपअभियंता मुके यांनी सांगितले.
महावितरण विभागाचे कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याने विजेच्या समस्यांविषयी कोणतीही चर्चा झाली नाही. तालुक्यातील जी कामे अपूर्ण अथवा सुरू झालेली नसतील त्या कामांचा निधी परत पंचायत समितीकडे वर्ग केला जाईल, त्यामुळे आपापल्या गावातील कामे वेळेत पूर्ण करावीत, अशी सूचना गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांनी या वेळी केली़
या वेळी महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी तळपे व मंडल अधिकारी काळे उपस्थित नसल्याने कामगार तलाठी बढे यांनी महसूल विभागाचा आढावा घेतला.
या वेळी पंचायत समिती सदस्या सारिका औटी, अनघा घोडके, गटशिक्षणाधिकारी के़ बी़ खोडदे, कृषी विस्तार अधिकारी बेनके, विविध विभागांचे अधिकारी व अभियंता, तसेच गटातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, गावकामगार तलाठी, केंद्रप्रमुख व सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
नळावणेत आरोग्यसेविकेवर निलंबनाची कारवाई
आणे येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र प्रस्तावित आहे. सध्या असलेल्या आणे व नळावणे येथील उपकेंद्रात सुविधा उपलब्ध करून कामकाजात सुधारणा करण्यात येईल.
आरोग्य केंद्रात स्वाइन फ्लूची औषधे उपलब्ध केली जातील. नळावणे येथील आरोग्यसेविका कामात हलगर्जीपणा करीत असल्याची तक्रार आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून शिंदेवाडी येथील आरोग्यसेविकेकडे तेथील कामाचा अतिरिक्त भार सोपवला जाईल, असे आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ़ शाम बनकर यांनी सांगितले़