प्रत्येक वारकऱ्याची आहे एक कथा...

By Admin | Published: June 20, 2017 06:55 AM2017-06-20T06:55:39+5:302017-06-20T06:55:39+5:30

वारीत सहभागी होणे जसं पूर्वजन्माची पुण्याई, असे वारकरी परंपरेत मानले जाते; पण या पुण्याईला कधी कधी अवचित प्रसंगाचा या जन्माचा गंध लाभतो.

Every Warkari has a story ... | प्रत्येक वारकऱ्याची आहे एक कथा...

प्रत्येक वारकऱ्याची आहे एक कथा...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वारीत सहभागी होणे जसं पूर्वजन्माची पुण्याई, असे वारकरी परंपरेत मानले जाते; पण या पुण्याईला कधी कधी अवचित प्रसंगाचा या जन्माचा गंध लाभतो. हा गंध एक एक हरिभक्तीच्या कृपादृष्टीच्या सुंदर कथांचा मिलाफ असतो. मग, या वारीचं आपल्या आयुष्याशी नातं जमलं की माघार घेण्याची इच्छा दैवाला ही सहज शक्य होत नाही.
या वारीशी नाळ जोडून सलग तीस, चाळीस, पन्नास वर्षे प्रामाणिकपणे त्या द्वारकेच्या राणाच्या दर्शनाची ओढ पूर्ण केलेली उदाहरणे या वारीत भेटतात. तेव्हा मन आश्चर्याने थबकून जाते. कारण, वारीच्या या अतूट साधनेतले हरएक अडथळे ते विठूरायावर सोडतात अन् तोही या भक्तांंच्या या विश्वासाला पात्र ठरत त्यांची वारी सुरू ठेवतो. या नात्यांच्या साक्षीदार अशा काही व्यक्तींची अनोखी भेट पालखी सोहळ््यानिमित्त घडली आणि उलगडला एक भक्तिरसाचा नवा अध्याय. त्या व्यक्तींच्या या रंगतदार कथा.

बीड जिल्ह्यातील पाटसरा गावचे मच्छिंद्र साबळे यांनी सांगितले की, भावाच्या वेडेपणाच्या उपचारासाठी पुण्यात ससून रुग्णालयात आलो होतो. त्या वेळी नेमकी पालखीच्या आगमनाची चर्चा कानावर पडली. घरातल्या रुग्णाला अंथरुणावर कसे सोडून जाता येईल. मनात विचार आला सगळे ठिक असते तर नक्की या पालखीत गेलो असतो. काही क्षणात डॉक्टरांनी भावाच्या वेडेपणाचे निदान झाले आहे, त्याची प्रकृती व्यवस्थित आहे. त्याला घरी घेऊन जाण्यास हरकत नाही. तिथून मी कुटुंबासह पंढरपूरला गेलो आणि पुढच्या वर्षी गंध-टिळा लावण्याचे काम हाती घेत वारी केली. पुन्हा मनात आले, या वारीत आपण जास्तीचे काय करू शकतो, तसे लक्षात आले की श्रावणबाळाने जशी कावड घेऊन आपल्या आईवडिलांना काशीयात्रा घडविली, तशीच सेवा
तुकाराममहाराज व ज्ञानेश्वरमहाराज यांना आपण कावडीने पंढरपूरची यात्रा घडवावी. त्यावर्षीपासून कावड नेण्याची परंपरा सुरु केली जवळपास लाख दीड लाख भाविक या कावडीचे दर्शन घेतात. यापेक्षा अजून दुसरी आयुष्याची अन् वारीची सार्थकता काय असावी. - मच्ंिछद्र साबळे, पाटसरा, बीड

अकलूजचा गणेश धुमाळ म्हणाला, चांगले शिक्षण पूर्ण झाले होते. पण कुठेच नोकरी मिळत नव्हती. सर्व ठिकाणी मला अपयशच येत होते. काही केल्या मार्ग सापडत नव्हतो. असेच मित्रांसोबत देहूला गेलो होतो. तिथे मंदिरात दर्शनाला उभे राहिल्यावर सहज प्रार्थना केली फक्त देवा जे मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे, त्याला प्रतिसाद दे. पुढे दोनतीन वर्षाने राज्य परिवहन मंडळाकडून इंदापूर बस डेपोत मॅकेनिक म्हणून निवड झाल्याचा फोन आला. कुठेही देवावर विश्वास न ठेवणारा मी नकळत तुकाराम महाराजांच्या वारीत ओढलो गेलो. आज वारीचं हे नोकरी लागल्यावरचं पाचवं वर्ष आहे. खूप आनंद मिळतो. वारीचे काही महिन्यांआधीपासूनच वेध लागतात. या वारीत मी नुसता येत नाही तर लोकांना विनामूल्य गंध लावण्याचे काम करतो. ही एक विलक्षण समाधान देणारी गोष्ट आहे.
- गणेश धुमाळ, अकलूज

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावचे गोरखनाथ म्हणाले, मला अपंगत्व येण्याआधीपासून ही पंढरीची वारी सुरु आहे. पण दोन्ही पायांचे आॅपरेशन झाल्यावर चालता येणं शक्य नव्हतं, यामुळे वारी बंद होेणार या अस्वस्थतेने मला खूप वाईट तसेच भीती वाटली. त्याकाळी व्हीलचेअर मिळत नव्हती. पांडुरंगाला हात जोडले आणि विनवणी केली की, भगवंता तुझ्या इच्छपुढे कुणाचे काय चालले आहे. बघ तुला जसे हवे आहे तसे ते घडेल. मला मनापासून तुझ्या दर्शनाची ओढ कायम असणार आहे. काही दिवसांनी नंतर एका दात्याने माझी तळमळ बघितल्यावर गुजरातहून व्हीलचेअर मागवली. आणि तेव्हा सुरु झालेली ही वारी आज चाळिसाव्या वर्षीही करीत आहे.
- गोरखनाथ म्हस्के, शेवगाव

Web Title: Every Warkari has a story ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.