दुर्लक्षामुळे रेबिजने दरवर्षी होतात १८ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 11:41 AM2019-02-12T11:41:26+5:302019-02-12T11:49:54+5:30
गेल्या पंधरा १४ वर्षांची आकडेवारी पाहिल्यास २००७ साली सर्वाधिक २९ मृत्यू रेबिजमुळे झाले होते
विशाल शिर्के
पुणे : कुत्र्याचा चावा दुर्लक्षित करणे... झाडपाल्याचा उपयोग... ग्रामीण भागात केले जाणारे देवादिकांचे उपचार...अशा विविध कारणांमुळे चांगले औषधोपचार असूनही केवळ दुर्लक्षामुळे दरवर्षी सरासरी १८ लोकांचा मृत्यू रेबिजमुळे होत आहे. यातील ९९ टक्के मृत्यू हे ग्रामीण भागातील नागरिकांचे झाले असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘लोकमत ’ला दिली.
पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर लवकर उपचार घेतल्यास रेबिजवर पूर्णपणे नियंत्रण मिळविता येते. मात्र या आजाराला तितकेसे महत्त्व दिले जात नसल्याने कुत्र्याचा चावा जीवघेणा ठरत आहे. पुणे शहरात दरमहा सरासरी साडेसातशे ते आठशे जणांना कुत्रा चावल्याची नोंद महापालिकेकडे होते. मात्र, रेबिजमुळे शहरातील नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अपवादात्मक आहे. रेबिजबाबत शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती असल्याने नागरीक पूर्ण उपचार करुन घेतात. त्या तुलनेत ग्रामीण भागातील नागरीक मात्र, त्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा उपचारच घेत नाहीत. काहीवेळा उपचार अर्धवट सोडून देतात. त्यामुळे संबंधित व्यक्तीला रेबिजची लागण होते.
गेल्या पंधरा १४ वर्षांची आकडेवारी पाहिल्यास २००७ साली सर्वाधिक २९ मृत्यू रेबिजमुळे झाले होते. तर या चौदा वर्षांत एकूण २५८ नागरिकांना कुत्र्याच्या चाव्याकडे दुर्लक्ष केल्याने आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर, २०१९मध्येही अजअखेरीस ६ नागरिकांचा रेबिजमुळे मृत्यू झाला आहे. कुत्र्याचा चावा ही आपत्कालीन परिस्थितीसारखी बाब नसली, तरी त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------------------
कुत्र्याच्या पिल्लाचा चावाही जीवघेणा
अनेकदा लहान कुत्र्याने चावा घेतला असेल तर दुर्लक्ष केले जाते. मात्र, लहान कुत्र्याचे पिल्लू रेबिज बाधित असल्यास ते लक्षात येत नाही. कारण त्याच्या वागण्यात मोठ्या कुत्र्यापेक्षा फारसे बदल दिसून येत नाही. त्यामुळे लहान कुत्र्याचा चावा देखील दुर्लक्षित करु नका, असे आवाहन अरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
----------------------
भारतात रेबिजचे सर्वाधिक बळी
देशाात दरवर्षी रेबिजमुळे सरासरी २५ ते ३० हजार नागरिकांना प्राण गमवावे लागते. जगभरात रेबिजमुळे होणाऱ्या मृत्यूपैकी ३६ टक्के मृत्यू भारतात होतात.
--------------------------------
रेबिजमुळे झालेले मृत्यू
२००५ १५
२००६ १८
२००७ २९
२००८ २२
२००९ १६
२०१० १५
२०११ १८
२०१२ २१
२०१३ १९
२०१४ २२
२०१५ १६
२०१६ २०
२०१७ १०
२०१८ १७
२०१९ ०६