दररोज एका बलात्काराची नोंद, समाजमाध्यमांतील बदनामीच्या तक्रारींमध्ये पाचपट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:42 AM2018-02-06T01:42:14+5:302018-02-06T01:42:17+5:30

शहरात दररोज एका अल्पवयीन मुलीवर अथवा महिलेवर बलात्कार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Everyday a rape is reported, there is a fivefold increase in defamatory complaints in the media | दररोज एका बलात्काराची नोंद, समाजमाध्यमांतील बदनामीच्या तक्रारींमध्ये पाचपट वाढ

दररोज एका बलात्काराची नोंद, समाजमाध्यमांतील बदनामीच्या तक्रारींमध्ये पाचपट वाढ

Next

पुणे : शहरात दररोज एका अल्पवयीन मुलीवर अथवा महिलेवर बलात्कार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असून, गेल्या सात वर्षांत या गुन्ह्यांच्या संख्येत चौपट वाढ झाली आहे. समाजमाध्यमांमधून देखील बदनामी केल्याच्या तक्रारींमध्ये तीन वर्षांतच पाचपटींहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे.
समाजमाध्यमांद्वारे मैत्री वाढवून जवळीक साधून बलात्कार करणे, लग्नाच्या आमिषाने बलात्कार करण्याच्या घटनांत वाढ नोंदविण्यात येत आहे. अशा घटनांमध्ये नातेवाईक, ओळखीच्या लोकांचाच जास्त भरणा आहे. काही घटनांत तर जन्मदाता अथवा सावत्र पितादेखील असल्याचे समोर आले आहे.
शहरात २०१०मध्ये अल्पवयीन मुलींवरील ८९ अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यात २०१७ अखेरीस तब्बल ३४९ घटनांपर्यंत वाढ झाली आहे. अशा घटनांत २०१५नंतर मोठी वाढ नोंदविली गेली. शहरात २०१५मध्ये २८० आणि २०१६मध्ये ३५४ गुन्हे नोंदविले गेले आहेत.
शहरात समाजमाध्यमांद्वारे मुलींची बदनामी केल्याच्या अवघ्या १५२ तक्रारी दाखल झाल्या होत्या. डिसेंबर २०१७अखेरीस तब्बल ८८५ तक्रार अर्ज दाखल झाल्याची नोंद सायबर क्राईम विभागाकडे झाली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती समोर आणली आहे. अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या संख्येची स्वतंत्र नोंद पोलिसांकडे होत नसल्याचे माहिती अधिकारातून दिसून येत आहे. तसेच, महिला अथवा मुलींची बदनामी केल्याच्या घटनांचीदेखील स्वतंत्र नोंद ठेवलेली नाही.
>पास्को कायद्याची
कडक अंमलबजावणी आवश्यक
शासनाने पुराव्याचा कायदा याकडे दुर्लक्ष करून पास्को कायदा आणला आहे़ त्यातील तरतुदी कडक आहेत़ आरोपीला जामीन मिळण्यातही त्यात अनेक कडक निर्बंध घातले आहेत़ या कायद्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविली़ शासन व पोलिसांनी त्याची कडक अंमलबजावणी केली तर अशा घटनांवर नियंत्रण बसू शकेल़
- अ‍ॅड़ एऩ डी़ पाटील
>सायबर विभागाकडे गतवर्षी ८८५ अर्ज
सायबर विभागाकडे २०१४पर्यंत अशा तक्रारींची नोंद ठेवण्यात येत नव्हती. त्यानंतर २०१५मध्ये १५२ तक्रार अर्ज सायबर क्राईम विभागाकडे प्राप्त झाले. पुढे २०१६मध्ये ५५२, २०१७मध्ये ८८५ अर्ज दाखल झाले. तर, १५ जानेवारी २०१८ पर्यंत १६ तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. समाजमाध्यमांत महिला आणि व्यक्तीची बदनामी झाल्याच्या तक्रारीतही वेगाने वाढ होत आहे.
वर्ष दाखल गुन्हे
२०१० ८९
२०११ ७८
२०१२ ८५
२०१३ १६८
२०१४ १८९
२०१५ २८०
२०१६ ३५४
२०१७ ३४९

Web Title: Everyday a rape is reported, there is a fivefold increase in defamatory complaints in the media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.