रोज दोन लाख लिटर पाण्याची होतेय नासाडी; नियोजनाची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 12:26 AM2019-02-05T00:26:26+5:302019-02-05T00:26:49+5:30
दौैंड तालुक्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून सेवाभावी संस्थांनी पाणी बचतीच्या संदर्भात पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- मनोहर बोडखे
दौैंड तालुक्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून सेवाभावी संस्थांनी पाणी बचतीच्या संदर्भात पुढाकार घेणे गरजेचे आहे. नुकतीच तहसील कचेरीत टंचाई आढावा बैैठक झाली. या बैैठकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते म्हणाले की, भविष्यात अन्न मिळेल पण पाणी मिळणे कठीण होऊन बसणार आहे. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातच तालुक्याच्या जिरायत पट्ट्यात ९ टँकर सुरु झाले आहेत.
एप्रिल, मे या महिन्यांत टँकरची संख्या जास्त असते. मात्र चालू वर्षी दोन महिने अगोदर ९ टँकर सुरु झाले ही पाणीटंचाईच्या दृष्टीने गंभीर बाब झाली आहे. तेव्हा पाणीटंचाई निवारणासाठी योग्य ते कामकाज झाले पाहिजे की जेणेकरुन पाण्याचे नियोजन केले जाईल.
नगर परिषद आणि ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक नळकोंडाळ्यांना तोट्या बसविलेल्या नाहीत. तेव्हा पाणी सुरु झाल्यानंतर हे नळकोंडाळे सुरु होतात. तेव्हा नळकोंडाळ््यांना तोट्या नसल्याने बेसुमार पाणी वाया जात असते.
तेव्हा सर्वात प्रथम या नळकोंडाळ््यांना तोट्या बसविणे गरजेचे आहे. तसेच वरवंड ते कुरकुंभ औद्योगिक वसाहत याचबरोबरीने पाटस गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन जलवाहिन्या आहेत. या दोन्ही जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागल्यामुळे पाण्याची नासाडी होत असल्याची वस्तुस्थिती आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातील अन्य काही भागांत आहे. तेव्हा नगर परिषद आणि ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी गळतीसाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. हिवाळी शिबिर अंतर्गत विद्यार्थ्यांना वेगवेगळी कामे दिली जातात. त्यानुसार प्रत्येक शिबिरात ग्रामीण पातळीवर वनराई बंधारा बांधणे सक्तीचे केले तर भविष्यात या बंधाºयांमध्ये पावसाचे पाणी साचून पाण्याचे नियोजन होऊ शकते.
नदीकाठच्या गावांमध्ये सध्याच्या परिस्थितीत बहुतांशी ठिकाणी वाळूउपसा केला जात आहे. तेव्हा वाळू ट्रकमध्ये भरल्यानंतर ही वाळू धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते. वाळू धुतल्यानंतर वाळूची माती बाजूला होते आणि वाळूला चांगला भाव मिळतो ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा वाळूमाफिया चोरीची वाळू धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी करतात.
साधारणत: एक ट्रक वाळू धुण्यासाठी सुमारे १000 लीटरच्या जवळपास पाणी वाया जाते. त्यानुसार दररोज दीडशेच्यावर ट्रकमधील वाळू धुतली जाते. याकामी दोन लाख लीटर पाणी वाया जात असल्याची वस्तुस्थिती आहे. तेव्हा महसूल विभागाने वाळूमाफियांवर योग्य ती जरब बसवून बेकायदा वाळू धुण्यासाठी जे काही पाणी वाया जाते यावर जरब बसवली पाहिजे. गेल्या पंधरवड्यात मध्यरात्रीच्या सुमारास दौैंड ते पाटस यादरम्यान एकापाठोपाठ एक सुमारे तीस ते पस्तीस वाळूचे ट्रक येत होते. या सर्व ट्रकमधून वाळू धुतलेल्या पाण्याची गळती लागली होती. एकंदरीतच दौंड ते पाटस या २0 किलोमीटरच्या अंतरावर जणू काही रस्त्यावर पाऊस पडला आहे. इतपत ओला रस्ता झाला होता. परिणामी सध्याच्या परिस्थितीत शिरुर, श्रीगोंदा, कर्जत या तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात अवैैध वाळू वाहतूक होत आहे. आणि ही वाळू दौैंडमार्गे पुढे पुण्याला पाठवली जात असते. एकंदरीत या सर्व पाणी वाया जाण्याचे प्रकार बघितले तर यावर शासनाने निर्बंध घातले पाहिजेत.
एकूणच वाळूमाफीयांवरील निर्बंधाबरोबर तालुक्याला उन्हाळ््यात लागणाºया पाण्याची गरज लक्षात घेऊन त्याचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.
तडीपार आणि दंड
गेल्या आठवड्यात वाळूमाफियांसंदर्भात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या की एका वाळूमाफियाला ज्याच्यावर वाळूचोरीचे गुन्हे आहेत, त्याला दौैंड पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे; तर दुसरीकडे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी तीन ते चार वाळूमाफियांना साडेचार कोटींचा दंड ठोठावला आहे. जर अशी कडक कारवाई वाळूमाफियांवर झाल्यास बेकायदा वाळू काढली जाणार नाही, परिणामी ती पाण्याने धुतली जाणार नाही; किंबहुना बेसुमार पाणी वाया जाणार नाही.