पुणेकरांना दररोज पाणी
By admin | Published: August 7, 2016 04:37 AM2016-08-07T04:37:32+5:302016-08-07T04:37:32+5:30
गेल्या अकरा महिन्यांपासून दिवसाआड पाणीकपातीचा सामना करणाऱ्या पुणेकरांना सोमवारपासून (दि. ८) पाणीकपातीमधून दिलासा मिळणार आहे. खडकवासला
पुणे : गेल्या अकरा महिन्यांपासून दिवसाआड पाणीकपातीचा सामना करणाऱ्या पुणेकरांना सोमवारपासून
(दि. ८) पाणीकपातीमधून दिलासा मिळणार आहे. खडकवासला कालवा सल्लागार समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत
हा निर्णय घेण्यात आला. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ही
घोषणा केली.
शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला धरणसाखळीमधील धरणे
९० टक्क्यांहून अधिक भरली आहेत. मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे एक वेळ पाण्यासाठी आवश्यक असलेले १२०० एमएलडी पाणी दिले जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी या बैठकीत केली. दरम्यान, पुढील महिन्यातील पाणीसाठा लक्षात घेऊन या कपातीचा फेरविचार करण्यात येणार असल्याचेही बापट
यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यामुळे पुणेकरांसाठी हा तात्पुरता दिलासा ठरणार आहे. महापालिकेतील भाजपा वगळता सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, शिवसेना, मनसे, तसेच रिपाइंने या मागणीसाठी शुक्रवारी (दि. ६) जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घातला होता. त्यानंतर बापट यांनी आज ही तातडीची बैठक बोलाविली होती.
जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार वंदना चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह जिल्ह्यातील आमदार बैठकीस उपस्थित होते. या बैठकीआधी पाणीकपातीची घोषणा करण्यासाठी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनाच्या परिसरात टाळ वाजवून आंदोलनही केले. (प्रतिनिधी)
धरणे ९० टक्के भरली
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रणालीत मागील वर्षी जेमतेम ५० टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे शहरात आॅक्टोबर २०१५ पासून पाणीकपात सुरू करण्यात आली होती. मात्र, या वर्षी जुलै आणि आॅगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाल्याने ही धरणे ९० टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणातून सोडण्यात येणारे पाणी शहरासाठी देण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार, हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पाटबंधारे विभागाकडून सध्या जादा पाणी देणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, महापालिका पदाधिकाऱ्यांसह पवार यांनीही पाणी मिळालेच पाहिजे, असा आग्रह धरला होता. त्यानंतर बापट यांनी जादा पाणी देण्यात येणार असल्याची घोषणा केली.