ज्याला हार्टबीट त्याला गाण्यातला बीट समजतोच :अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 09:17 PM2018-04-28T21:17:04+5:302018-04-28T21:17:04+5:30
नृत्य करण्यासाठी व्यक्ती कशी आहे, कशी दिसते यापेक्षा अधिक तिला त्यातून किती आनंद मिळतो हे अधिक महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या अंगात ताल असतो. नृत्य शिकणे किंवा न शिकणे हा वेगळा भाग असून ज्याला हृदयात बीट आहे त्याला तो गाण्यात पकडता येतोच.
पुणे : नृत्य माझ्यासाठी श्वासाइतके महत्वाचे असून त्यातून मला आत्मिक समाधान मिळत असल्याचे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने लोकमतसोबत केलेल्या संवादात सांगितले. जागतिक नृत्यदिनाच्या निमित्ताने तिने हा संवाद साधला. नृत्य करण्यासाठी व्यक्ती कशी आहे, कशी दिसते यापेक्षा अधिक तिला त्यातून किती आनंद मिळतो हे अधिक महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या अंगात ताल असतो. नृत्य शिकणे किंवा न शिकणे हा वेगळा भाग असून ज्याला हृदयात बीट आहे त्याला तो गाण्यात पकडता येतोच. इतकेच नव्हे तर फक्त व्हायब्रेशनच्या मदतीने कर्णबधीरही उत्तम नृत्य करतात. माझ्या तर रक्तात नृत्य असून ते माझ्यासाठी पॅशन आहे, आनंद आहे आणि समाधानसुद्धा ! मी तर आईच्या गर्भात असल्यापासून मी नाचत असावी असेही ती म्हणाली.
नृत्यातील प्रवासाबद्दल सांगताना ती म्हणाली की, ज्या अप्सरा आली लावणीमुळे मी घराघरात पोचले ती करतानाही तितकी शास्त्रीय लावणी लोकांना आवडेल की नाही यात आम्हाला शंका होती. त्यावेळी अप्सरा दाखवताना तिचे अप्सरा असतानाचे कपडे, मुकुट आम्ही ठेवला होता. त्यात फार वेगळ्या प्रकारे फुलवा खामकरने नृत्यदिग्दर्शन केलं होत आणि त्या गाण्याने घडवलेला इतिहास तर सर्वांना माहिती आहे. त्यामुळे कदाचित विविध रस तितक्याच नजाकतीने पेश करणारी लावणी मला सर्वाधिक भुरळ घालते. पण त्याव्यतिरिक्त मी नवनवीन नृत्यप्रकार शिकत असते. सध्या मी एरियल सिल्क, बेलीडान्स शिकत आहेत. हे शिक्षण कधीही संपणारे नसून हा प्रवास आयुष्यभर सुरु राहणार आहे. माझ्याकडे जे चांगले आहे ते मी इतरांना शिकवतेच आणि इतरांकडूनही शिकते. सध्या सुरु असणारे रियालिटी शोचे प्रमाण खूपच वाढले आहेत. पालकांनी मुलांना नक्की काय आवडते हे बघण्याची गरज आहे त्यातून त्यांचं बालपण तर हरवणार नाही ना याचाही विचार होणं गरजेचे आहे. स्पर्धा म्हटलं की हार-जीत ही असतेच पण त्या कलाकाराला स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध असते. त्यातून मोठमोठ्या नृत्य दिग्दर्शकांकडून नृत्य प्रकार शिकायला मिळतात, ओळख मिळते ही सकारात्मक बाजू लक्षात घेण्याची गरज आहे.
मला दिवंगत श्रीदेवी यांच्यासाठी नृत्य करायची प्रचंड इच्छा होती. त्यांना बघूनच मी शिकले. त्यांच्यासाठी एकदा परफॉर्म करायची इच्छा होती. त्यांच्या अनेक सिनेमांचा माझ्यावर प्रभाव आहे. मात्र इच्छा अपूर्ण राहणार आहे. नृत्यदिनाच्या निमित्ताने नक्की सांगेन की, स्वतःसाठी नक्की नाचा. त्यातून मिळणारी ऊर्जा नक्कीच कायम टिकणारी असते.शब्द समजून घ्या, शब्दांचा अर्थ समजून घ्या असं केलं तर तुम्हाला कधीही नैराश्य येणार नाही. त्यामुळे टीव्ही असो किंवा डी जे आणि मोबाईल असो किंवा एफ एम डान्स तो बनता है. स्वतःसाठी नक्की नाचा.आणि आयुष्य एन्जॉय करा.