बाधित शिक्षकांच्या संपर्कातील सर्वांची होणार चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:10 AM2020-12-26T04:10:12+5:302020-12-26T04:10:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जेजुरी : पुरंदर तालुक्यातील जवळपास २५ शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह सापडल्याने खळबळ उडाली होती. शिक्षक, विद्यार्थी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : पुरंदर तालुक्यातील जवळपास २५ शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह सापडल्याने खळबळ उडाली होती. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांत या मुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षकांबरोबर त्यांच्या संपर्कातील विद्यार्थी आणि पालकांचीही कोविड टेस्ट करून घ्यावी अशी मागणी पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाकडून करण्यात आली होती. गट विकास अधिकारी अमर माने यांनी बाधीतांच्या संपर्कात आलेल्यांची तसेच विद्यार्थ्यांच्या तपासणीच्या सुचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात ९ सप्टेंबर पासून ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या. पुरंदर तालुक्यातील सर्व शाळा सुरू झाल्या होत्या. विद्यार्थ्यांची संख्याही चांगली होती. दरम्यान, शिक्षकांच्या कोरोना चाचणी अत्यावश्यक असल्याने आरोग्य विभागामार्फत ह्या चाचण्या सुरू आहेत. गुरूवारी पुरंदर तालुक्यात एका दिवसात ११२ शिक्षकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. यात २५ शिक्षक पॉझीटिव्ह आले. यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांत ही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षकांबरोबर ससंपर्कातील विद्यार्थी आणि पालकांचीही कोरोना चाचणी करण्याची मागणी तालुका प्राथमिक शिक्षक संघाकडून करण्यात आली आहे.
पुरंदर च्या शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या कोविड टेस्ट घेण्याचे आदेश काढले आहेत. आदेशानुसार शिक्षकांकडून स्वतः च्या टेस्ट करून घेण्यास सुरुवात झाली आहे. २५ शिक्षक बाधीत सापडल्याने त्यांच्या संपर्कातील आलेल्यांना कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांचा थेट संपर्क आला आहे, त्या ठिकाणी मोठीच घबराट निर्माण झालेली आहे. यातच अनेक शिक्षकांनी आपण पॉझीटिव्ह आहोत हे पालक व विध्यार्थ्यांना सांगितलेले नसल्याने भविष्यात कोविड रुग्ण संख्या वाढण्याची मोठी शक्यता निर्माण झालेली आहे.
कोट
शिक्षकांच्या कोविड चाचण्या केल्या जात आहेत. ज्या शाळेतील शिक्षक पॉझीटिव्ह आलेले आहेत तेथील पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. त्या सर्वांच्या कोविड टेस्ट केल्या जातील. ऍन्टीजेन टेस्ट झालेल्या शिक्षकांत कोणत्याच प्रकारची कोविड लक्षणे दिसत नाहीत तरी ही ते पॉझीटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी आम्ही तालुका आरोग्य विभागाकडे आरटीपीसीआर टेस्ट करण्याची विनंती केलेली आहे. आरटीपीसीआर टेस्ट मधूनचच वस्तुस्थिती समोर येणार आहे.
-मोहन गायकवाड, गट शिक्षण अधिकारी, पुंरदर
कोट
शिक्षकांची टेस्ट घेतल्यानंतर अनेकजण पॉझीटिव्ह आलेले आहेत. ही बाब गंभीर आहे. मात्र, याबाबत आरोग्य विभागाकडून पॉझीटिव्ह रुग्ण, व त्यांच्या संपर्कातील आलेल्या सर्वांच्या कोविड टेस्ट करणार आहोत तशा सूचना गट विकास अधिकारी यांच्याकडून आलेल्या आहेत.
उज्वला जाधव, तालुका आरोग्य अधिकारी
कोट
२५ शिक्षक कोरोना बाधीत ही बाब गंभीर आहेच. शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. पालक विध्यार्थी जे जे पॉझीटिव्ह शिक्षकांच्या संपर्कात आलेले असतील त्या सर्वांच्या टेस्ट करण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
- अमर माने, गट विकास अधिकारी
चौकट
पुरंदर तालुक्यात इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची संख्या १७०० पर्यंत आहे. ९ सप्टेंबर पासून शाळा महाविद्यालये सुरू झाली आहेत. सुरुवातीला ११५० माध्यमिक व तत्सम शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या टेस्ट घेतलेल्या होत्या. त्यात ही ३० ते ३५ जण पॉझीटिव्ह होते. उरलेले शिक्षकांच्या टेस्ट आता केल्या जात आहेत. त्या टेस्ट ऍन्टीजेन न करता आरटीपीसीआर टेस्ट करणेच गरजेचे बनले आहे. यामुळे खरी वस्तुस्थिती समोर येईल. शिक्षक पॉझीटिव्ह आल्यास त्या शिक्षकांनी ही आपल्या संपर्कातील माहिती प्रशासनाला देणे गरजेचे आहे.