प्रत्येकाला चंद्राची ओढ; ‘चंद्रयान ३’ चे लॅन्डिंग पुणेकरांना पाहता येणार, शहरात अनेक ठिकाणी सोयी
By श्रीकिशन काळे | Published: August 22, 2023 04:24 PM2023-08-22T16:24:52+5:302023-08-22T16:26:32+5:30
घरात टीव्हीवर चंद्रयान ३ चे लॅन्डिंग पाहता येणार असून काही शाळा, महाविद्यालयांमध्ये आणि खासगी संस्थांमध्येही सोय करण्यात येणार
पुणे: भारताचे ‘चंद्रयान ३’ बुधवारी (दि.२३) सायंकाळी साडेसहा वाजता चंद्रावर उतरणार आहे. हे दृश्य पुणेकरांना पाहता यावे, यासाठी अनेक ठिकाणी सोय करण्यात आली आहे. पुणेकर घरात बसूनही टीव्हीवर ते पाहू शकणार आहेत. परंतु, काही शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आणि खासगी संस्थांमध्येही त्याचे आयोजन केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘एनसीआरए’ सभागृहात सायंकाळी ६ वाजता मोठ्या पडद्यावर पाहण्याची सोय केली आहे. तिथे खगोलतज्ज्ञ देखील उपस्थित असतील, त्यांचे मार्गदर्शनही मिळणार आहे. टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमध्येही हजारो विद्यार्थ्यांना ‘चंद्रयान ३’ लाइव्ह दाखविण्यात येईल. या ठिकाणी दुपारी ४ वाजल्यापासून ते ७ वाजेपर्यंत कार्यक्रम असेल. त्यात विज्ञान शिक्षक प्रा. व्ही. व्ही. रामदासी, खगोल अभ्यासक पराग महाजनी चंद्राविषयीची माहिती विद्यार्थ्यांना देणार आहेत. रामदासी यांनी तर खास गीतांच्या माध्यमातून चंद्राबद्दलचे प्रेम उलगडणार आहेत.
रामदासी म्हणाले, आपल्या जीवनात चंद्राला विशेष महत्त्व आहे. आपल्या जीवनात, कवितेमध्ये, खेळामध्ये, गोष्टींमध्ये चंद्राचा उल्लेख येतो. त्यामुळे त्याचे विशेष आकर्षण प्रत्येकाला आहे. म्हणून चंद्रयान ३ पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. गीतांच्या माध्यमातून आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना चंद्रयान ३ लाइव्ह दाखविणार आहोत.’’ लॉ कॉलेज रोडवरील नॅशनल फिल्म अकाईव्ह ऑफ इंडिया (एनएफएआय) या संस्थेमध्येही बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर चंद्रयान ३ पाहता येणार आहे.